
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगावात सध्या ‘ऑक्टोबर हीट’चा चटका जाणवत आहे. जळगावचे कमाल तापमान आता ३७ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्यामुळे नागरिक उकाड्याने पुरते हैराण झाले आहेत. अशातच दुसरीकडे परतीच्या पावसाचे संकेत मिळत आहेत.
सोमवारी जळगावचा कमाल पारा ३७.५ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. यामुळे दिवसा कडक ऊन आणि उकाडा तर सकाळी आणि रात्री हवेत हलका गारवा, असे संमिश्र हवामान सध्या जळगावकरांना अनुभवायला मिळत आहे.
दरम्यान, मान्सूनच्या परतीचा प्रवास सुरु झाला असून जळगाव जिल्ह्यात मात्र उन्हाचा चटका वाढलेला दिसून येत आहे. अशातच हवामान खात्याने जिल्ह्यात पावसाचा अंदाज वर्तविला आहे.
बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे राज्यात पुन्हा पावसाला पोषक वातावरण तयार झाले आहे. हवामान विभागाच्या अंदाजानुसार पुढील दोन दिवस जळगाव, नाशिक, अहिल्यानगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यांत काही ठिकाणी पावसाच्या सरी पडण्याची शक्यता आहे.
त्यामुळे जळगावकरांना दिवसा उन्हाचा चटका आणि त्यानंतर पावसाच्या सरी, असे संमिश्र हवामान अनुभवायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान, तापमानात चढ-उतार सुरू असल्याने नागरिकांनी बदलत्या हवामानाची खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात येत आहे.





