जळगाव लाईव्ह न्यूज । २ जानेवारी २०२६ । जळगावसह राज्यात मागील काही दिवसांपासून थंडीचा कडाका होता. मात्र, नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच अचानक पावसाचे सावट निर्माण झाल्याने थंडीचा कडाका कमी होणार आहे. ४ जानेवारीपासून जळगाव शहरासह जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण निर्माण होण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून, यामुळे थंडीचा जोर ओसरणार आहे.

हवामान विभागाच्या अंदाजानुसार, नवीन वर्षाच्या पहिल्या दोन दिवसात थंडीचा कडाका कायम राहू शकतो. मात्र, ४ जानेवारीपासून वातावरणात बदल होऊन ढगाळ स्थिती निर्माण होईल. यामुळे किमान तापमान वाढणार आहे. पावसाचे सावट; पण शक्यता कमी उत्तर भारतात निर्माण झालेल्या हवामान बदलांमुळे महाराष्ट्रात ढगाळ हवामान तयार होत आहे.

जरी आकाश ढगाळलेले राहणार असले, तरी जिल्ह्यात मोठ्या पावसाची शक्यता कमीच आहे. काही ठिकाणी अगदीच किरकोळ स्वरूपाचा पाऊस पडू शकतो, असे हवामान तज्ज्ञांकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

तापमानात घसरण
जळगावचे तापमान पुन्हा घसरले आहे. दोन दिवसापूर्वी १० अंशाच्या वर असलेला किमान तापमानाचा पारा गुरुवारी घसरून ९.२ अंशावर आला. दिवसाचा पारा २८ अंश इतका होता. सकाळ आणि रात्रीच्या वेळेस थंडी जाणवत असली तरी दुपारच्या वेळेस उन्हाचा चटका कायम आहे. दरम्यान हवामान खात्याच्या अंदाजानुसार जिल्ह्यात सध्या थंडी कमी होणार असली, तरी हा दिलासा अल्पकाळ टिकणारा आहे.
हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, जानेवारी महिन्याच्या दुसऱ्या किंवा तिसऱ्या आठवड्यापासून पुन्हा एकदा थंडीचा कडाका वाढणार आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड वाऱ्यांच्या प्रभावामुळे तापमानात पुन्हा मोठी घट होऊन जिल्ह्याला हुडहुडी भरवणारा गारठा अनुभवावा लागणार आहे.



