जळगाव लाईव्ह न्यूज । आजपासून नवीन वर्षाला सुरुवात झाली आहे. गेल्या वर्षात विक्रमी उसळी घेतलेल्या सोन्यासह चांदीचे दर या २०२६ मध्ये स्वस्त होणार की आणखी महागणार? याकडे ग्राहकांचे लक्ष लागून आहे. दरम्यान आज वर्षाच्या पहिल्याच दिवशी सोने दरात कोणतीच वाढ अथवा घट झाली नाहीय. मात्र चांदी दर आज घसरण झाली आहे.

जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत सरत्या वर्षात सोन्यासह चांदी दराचे गगनाला भिडले आहेत. सोन्याचा दर १ लाख ४० हजाराच्या वर तर चांदीचा दर तब्बल अडीच लाखावर पोहोचला. मात्र २०२५ वर्षाच्या अखेरीस दोन्ही धातूंच्या दरात घसरण दिसून आली. गेल्या आठवड्यात उच्चांकावर पोहोचलेले सोन्याचे दर सलग तीन दिवसांपासून घसरत होते. सततच्या दरवाढीने त्रस्त झालेल्या ग्राहकांना त्यामुळे मोठा दिलासा मिळाला

सोमवारपासून बुधवारपर्यंतच्या तीन दिवसांत सोने तब्बल ६६९५ रूपयांनी स्वस्त झाल्याचे सुवर्ण व्यावसायिकांनी सांगितले. आज गुरूवारी सकाळच्या सत्रात कोणतीच वाढ अथवा घट नोंदवण्यात आली नाही. त्यामुळे २४ कॅरेट सोन्याचे दर जीएसटीसह प्रति १० ग्रॅम एक लाख ३७ हजार ७११ रूपयांवर स्थिरावले.
चांदीत १०३० रूपयांनी वाढ
जळगाव शहरातील सुवर्ण बाजारपेठेत मंगळवारी चांदीचे दर जीएसटीसह दोन लाख ४७ हजार रूपयांवर स्थिर होते. बुधवारी दिवसभरात आणखी ५१५० रुपयांची घट झाल्याने चांदीचे दर जीएसटीसह दोन लाख ४२ हजार ५० रुपयांपर्यंत घसरले. गुरूवारी सकाळी बाजार उघडल्यावर पुन्हा १०३० रूपयांची घट नोंदवली गेली. त्यामुळे चांदीचे दर जीएसटीसह प्रति किलो दोन लाख ४३ हजार ०८० रूपयांपर्यंत वधारले.
सुवर्ण व्यावसायिकांनी दिलेल्या माहितीनुसार आंतरराष्ट्रीय बाजारातील संकेत, डॉलरच्या मूल्यातील चढ-उतार तसेच गुंतवणूकदारांची नफा वसुली (प्रॉफिट बुकिंग) यांचा थेट परिणाम स्थानिक सुवर्ण बाजारावर झाला. परिणामी, गेल्या काही दिवसांत सोन्याच्या दरात सलग घसरण नोंदवली गेली. या घसरणीमुळे दीर्घकाळ प्रतीक्षेत असलेले ग्राहक दागिन्यांच्या खरेदीसाठी बाजारात उतरल्याचे दिसून आले.











