जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ मार्च २०२६ । हवामान खात्यानं जळगाव जिल्ह्यात अवकाळी पावसाबद्दल वर्तविलेला अंदाज खरा ठरला असून सोमवारी जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह जोरदार पावसाने तडाखा दिला. काही ठिकाणी गार देखील पडल्याने नागरिकांची तारांबळ उडाली. या पावसामुळे उकाड्यातून नागरिकांना दिलासा मिळला. मात्र पावसामुळे अनेक पिकांना फटका बसला आहे. यांनतर पुढील काही दिवसही हवामान अस्थिर राहण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे.

हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, आज ३१ मार्च रोजी जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून २ एप्रिलपर्यंत पावसाचे वातावरण कायम राहणार आहे. त्यामुळे शेतकरी वर्गाची चिंता वाढली आहे.

मार्च महिन्यात हवामानात बदल पाहायला मिळत आहे. एकीकडे उन्हाचा तडाखा वाढला असताना त्यातच अवकाळी पावसाने सावट निर्माण झाले आहे. यापूर्वीच हवामान खात्यानं जळगावसह महाराष्ट्र्रात अवकाळी पावसाचा इशारा दिला आहे. यात काही ठिकाणी गारपीट होण्याचा अंदाजही वर्तविण्यात आला आहे.
त्यानुसार सोमवारी जळगाव शहरासह जिल्ह्यात वादळी वारा, विजांच्या गडगडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला. काही ठिकाणी गारपीटही झाली. यामुळे वातावरणात गारवा निर्माण झाल्यानं उकाड्यातून जळगावकरांना दिलासा मिळाला. तापमानात २ ते ३ अंशांनी घट झाल्याचेही निरीक्षण नोंदविण्यात आले आहे. तरी या अवकाळीचा पिकांना फटका बसणार आहे. हवामानातील या बदलामुळे पुढील काही दिवस परिस्थिती आणखी बिघडू शकते, असा इशारा हवामान विभागाने दिला आहे.
या तारखेपर्यंत पावसाचा अलर्ट?
हवामान खात्याच्या माहितीनुसार, आज ३१ मार्च रोजी वाऱ्याचा वेग ताशी ३० ते ४० किलोमीटर राहण्याची शक्यता असून विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात आज ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. तर १ आणि २ एप्रिल रोजी जिल्ह्यात येलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. या कालावधीत झाडे कोसळणे, वीजपुरवठा खंडित होणे आणि पिकांचे नुकसान होण्याची शक्यता असल्याने नागरिकांनी आणि शेतकऱ्यांनी आवश्यक खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.







