जळगाव लाईव्ह न्यूज । ३० जून २०२३ । राज्यात खोळंबलेला पाऊस २३ जून पासून पुन्हा सक्रिय झाल्यानंतर राज्यातील अनेक ठिकाणी दमदार हजेरी लावली. त्यामुळे शेतकरी काहीसा सुखावला. मात्र जळगाव जिल्ह्यात जून संपत आला तरी अद्यापही पेरणीयोग्य पाऊस न झाल्याने शेतकरी वर्ग चिंतेत आहे. आता शेतकरी मुसळधार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. यंदा जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 ते 9 टक्केच पेरण्या झाल्या आहेत.
यंदा बिपोरजॉय चक्रीवादळामुळे मान्सून पाऊस लांबला असून जून महिना संपत आला तरी अद्यापही दमदार पाऊस झाला नाहीय. मागील काही दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी दमदार पाऊस सुरु आहे. मात्र जळगाव जिल्ह्यात पाऊस रुसला आहे. पाऊस लांबल्याने पेरण्या खोळंबल्या.
जळगाव जिल्ह्यात आतापर्यंत केवळ 8 ते 9 टक्के पेरण्या झाल्या. जिल्ह्यात खरिपाचे एकूण क्षेत्र 7 लाख 69 हजार 601 इतके आहे. त्यापैकी केवळ 68 हजार 530 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली आहे. त्यात देखील 67 हजार 194 हेक्टर कापसाची पेरणी झाली आहे. त्यामुळे उडीद, तूर, सोयाबीन, मूग, तीळ या पिकांची पेरणी झाली नाहीय. दरम्यान कृषी विभागाने 100 मिमी पाऊस झाल्याशिवाय पेरणी करू नये असे आवाहन केलं आहे.
जिल्ह्यात केवळ 38 मिमी पाऊस
दरम्यान, मागील काही दिवसापासून जिल्ह्यात ढगाळ वातावरण आहे. दररोज पावसाचे ढग दाटून येत असले तरी पाऊस हुलकावणी देत आहे. काल गुरुवारी जिल्ह्यातील अनेक तालुक्यांमध्ये पावसाने हजेरी लावली. हा पाऊस दमदार नसला तरी शेतकऱ्यांना धीर देणार आहे. अद्यापही शेतकरी दमदार पावसाची प्रतीक्षा करीत आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 38 मिमी पाऊस झाला.