जळगाव लाईव्ह न्यूज । ०७ एप्रिल २०२१ । जिल्ह्यात आतापर्यंत कोरोना लसीकरण वेगात सुरू असतानाच आज मात्र शहरातील सर्वच लसीकरण केंद्रे बंद होती. ग्रामीण भागातील काही लसीकरण केंद्रावर लस असल्याने ती सुरू होती. लसीकरण बंद झाल्याने नागरिकांच्या लसीकरणाचा मोठा प्रश्न निर्माण झाला आहे. आगामी दोन दिवसात लसीकरण केंद्र लसीच्या तुटवड्यामुळे बंद राहणार असल्याची माहिती आरोग्य विभागाने दिली.
जिल्ह्यात आजअखेर कोवीशिल्ड लसींच २ लाख ४ हजार ३४० डोस आले होते. त्यातील १ लाख ९५ हजार ५४० डोस वापरले गेले. ८ हजार ८०० डोस गेल्या देान दिवसात ग्रामीण भागातील लसीकरण केंद्रावर पाठविण्यात आले आहेत. तर कोव्हॅक्सीन लसींचे १८ हजार डोस आले आहेत. तेही वापरले गेले. आता ३ हजार ६८० को व्हॅक्सीन लसींचे डोस आले आहेत. ज्यांनी अगोदर को-व्हॅक्सीन लस अगोदर घेतली गेले त्यांनाच ते दिले जातील.
कोवीशिल्ड लसीचे डोस संपल्याने शहरातील रेडक्रॉस सोसायटी, रोटरी भवन, छत्रपती शाहू महाराज रुग्णालय, शिवाजी नगर रुग्णालय व खासगी ठिकाणी सुरू असलेले लसीकरण आज बंद होते. जेव्हा लसींचे डोस उपलब्ध होतील तेव्हा लसीकरण पुन्हा सुरू होईल. शासनाकडे आपण १ लाख ३० हजार लसींची मागणी केली आहे. अशी माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.बी.टी.जमादार यांनी दिली.
एकीकडे कोरोनावर लसीकरण हाच बेस्ट उपाय आहे. त्यासाठी शासन ४५ वर्षावरील सर्वांना लसीकरण सक्तीचे करीत आहे. दुसरीकडे केंद्राकडून राज्यांना लसींचा पुरवठा होत नाही. लसीकरणा नंतर तब्बल ६० दिवसांनी कोरोनाशी लढायला अॅन्टीबॉडीज तयार होतात. जेवढया जास्त नागरिकांचे लसीकरण लवकर होतील त्यानंतरच्या कालावधीत ॲन्टीबॉडीज तयार होतील. यामुळे लसीकरणाकडे गांभीर्याने लक्ष देण्याची जबाबदारी आरेाग्य यंत्रणा व जिल्हा प्रशासनावर आहे. लसी उपलब्ध नसतील तर कोरोनाला प्रतिबंध कसा घालणार ? असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाला आहे.