जळगाव लाईव्ह न्यूज | २ मे २०२१ | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने जिल्हा बंदीचे आदेश जारी केले आहेत. जिल्हा अंतर्गत किंवा जिल्ह्याबाहेर प्रवास करण्यासाठी ई-पास आवश्यक असून दररोज तब्बल ५०० पेक्षा अधिक नागरिक ई-पाससाठी अर्ज दाखल करीत आहे. सुट्टीचा दिवस असतानाही पोलीस अधिकारी व कर्मचारी काम करीत असून दररोज १५० पेक्षा अधिक पास मंजूर केल्या जात आहेत.
कोरोनामुळे बाहेरगावी जाण्यासाठी शासनाने ई पास बंधनकारक केला असून ठराविक कारणासाठीच पास दिला जात आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक कार्यालयातील पासपोर्ट शाखेत ई-पास तपासणी आणि मंजुरीचे काम सुरू आहे. दररोज सरासरी ५०० प्रकरणे येतात आणि त्यातील नियमात बसणारी १५० प्रकरणे मंजूर केली जातात. पासपोर्ट शाखेत सहाय्यक निरीक्षक दिलीप पाटील, आखेगावकर, सहाय्यक उपनिरीक्षक नरेंद्र पवार, कर्मचारी उदय कापडने, महिला कर्मचारी ज्योती पाटील हे दिवसभर सेवा बजावतात. रविवारी सुट्टी असताना देखील ई-पासच्या तपासणीचे काम सुरू होते.
११ दिवसात ७८५ पास मंजूर तर ३७२२ नाकारल्या
ई-पासची सेवा सुरू होऊन ११ दिवस झाले. ११ दिवसात ७८५ प्रकरणे मंजूर करण्यात आले असून ३७२२ प्रकरणे नामंजूर करण्यात आली आहे. सध्या १५०८ प्रकरणे प्रलंबित असून नवीन अर्जाचा ओघ सुरूच आहे.
फक्त ‘या’ कारणासाठी मिळतोय ई-पास
शासनाच्या निर्देशानुसार बाहेर जिल्ह्यात जाण्यासाठी ई-पास आवश्यक करण्यात आलेला आहे. अंत्यविधी, लग्न सोहळा आणि वैद्यकीय कारणांसाठीच परवानगी दिली जात आहे. पाससाठी लग्नपत्रिका, मृत्यू दाखला, डॉक्टरांचे प्रमाणपत्र, कोविड तपासणी रिपोर्ट जोडणे आवश्यक आहे. नागरिक योग्य कागदपत्रे अपलोड करीत नसून त्यामुळे त्यांना परवानगी नाकारली जात आहे.