⁠ 
गुरूवार, मे 2, 2024

Jalgaon Cotton Rate : कापसाच्या दराची पडझड थांबेना.. चांगल्या कापसाला मिळतोय ‘इतका’ भाव

जळगाव लाईव्ह न्यूज | 4 फेब्रुवारी 2024 | कापसाच्या दराची पडझड काही केल्या थांबत असून या आठवड्यात कापसाचा भाव ३०० ते ४०० रुपयांनी घसरला आहे. सध्या कापसाच्या खासगी बाजारपेठेत चांगल्या कापसाला ६४०० ते ६६५० रुपये दर मिळाले होते. एकंदरीत कापसाला हमीभावाच्या कमी दर मिळत असल्याची स्थिती असून यामुळे कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत सापडला आहे.

नगदी पीक व पांढरे सोने म्हणून ओळखला जाणारा कापूस आता दरवाढीच्या अपेक्षेने सांभाळणेही शेतकऱ्यांना जड जात आहे. गेल्यावर्षीच्या तुलनेत यंदा कापसाला चांगला भाव मिळेल, या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापसाची लागवड केली. मात्र, दुष्काळ, अवकाळी पाऊस आणि गारपीटीच्या तडाख्यात हजारो हेक्टरवरील कापसाचे पीक उद्ध्वस्त झाले. त्यात उरल्या सुरल्या आशेवर बाजारभावाने पाणी फेरलं.

सध्या कापसाला कवडीमोल भाव मिळत आहे. त्यामुळे लागवडीसाठी लागलेला खर्चही निघेनासा झाला आहे. सरकारने कापसाला जास्तीत जास्त हमी भाव द्यावा, अशी मागणी शेतकरी करीत आहेत.दोन वर्षांपूर्वी २०२२ मध्ये जानेवारी ते फेब्रुवारी महिन्यात कापसाला चांगला भाव मिळाला होता. पांढऱ्या सोन्याला प्रतिक्विंटल १० ते ११ हजार रुपये बाजारभाव मिळाल्याने शेतकरी आनंदित झाले होते.

यावर्षी देखील कापसाचा भाव वाढेल, या आशेवर शेतकरी आहेत. मात्र, फेब्रुवारी महिना सुरू झाला तरी चांगल्या कापसालाही ६ हजार ४०० ते ६ हजार ६५० इतकाच भाव मिळत आहे. त्यातच दिवसेंदिवस बाजारभाव कमी होत असल्याने आता किती दिवस कापूस सांभाळावा, असा प्रश्न निर्माण झाला आहे.

यंदा केंद्र शासनाने कापसाला मध्यम ते लांब स्टेपलनुसार ६६२० ते ७०२० रुपये प्रतिक्विंटल असा दर जाहीर केला आहे. बाजारात मात्र ६४०० ते ६६५० रुपयांपर्यंत विक्री होत आहे. जळगाव जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यात शासन खरेदी सुरू नसल्याने शेतकरी दरवाढीच्या प्रतीक्षेत कापसाची साठवणूक करीत आहेत. मात्र, कापूस सांभाळावा तरी किती दिवस हा प्रश्न कापूस उत्पादकांना सतावत आहे.