कापसाच्या दरात 1000 रुपयांची वाढ ; जळगावात आता इतका मिळतोय भाव..
जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । आज वा उद्या कापसाचे दर वाढतील या आशेने शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला होता.मात्र भाववाढ न झाल्याने अनेक शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस विक्रीला काढला. मात्र गेल्या महिन्यात फेब्रुवारीत साडे सहा हजार रुपयावर असलेला कापसाचा दर आता साडे सात हजार रुपयावर आला आहे. गेल्या महिन्याभरात कापसाच्या दरात क्विंटलमागे १ हजार रुपयांची वाढ झाली आहे.
यंदाच्या हंगामाच्या सुरुवातीला सप्टेंबर २०२३ मध्ये कापसाला ८ हजार ते ८५०० हजारापर्यंत दर मिळाला होता. यानंतर कापसाचे दर आणखी वाढू शकतात या अपेक्षेत शेतकरी होते. मात्र या उलट झाले. यानंतर कापसाच्या दरात घसरण झाल्याने कापूस उत्पादक शेतकरी चिंतेत सापडला होता. दरवाढीच्या आशेने बहुतांश शेतकऱ्यांनी कापूस घरात भरून ठेवला होता. मात्र भाववाढ न झाल्याने कमी दरात विक्री करावी लागली. यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक झळ सहन करावी लागली. परंतु आता गेल्या काही दिवसात कापसाच्या दरात वाढ होत आहे.
एकीकडे कापसाचा खरेदीचा हंगाम संपण्यात आला असताना, दुसरीकडे कापसाच्या दरात मात्र वाढ होत असल्याचे दिसून आले. ज्या शेतकऱ्यांनी कमी दरात कापूस दिला त्या शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. सध्या भाव वाढले असले तरी कापसाची आवक जिल्ह्यात जवळपास कमीच झाली आहे. जिनिंगमध्ये कापसाची आवक ९५ टक्क्यांनी कमी झाली आहे.
फेब्रुवारी महिन्यात कापसाचे ६,६०० रुपयांपर्यंत असलेले दर सद्यःस्थितीत ७,६०० रुपयांवर आले आहेत. एकीकडे जळगाव जिल्ह्यात कापसाचे भाव वाढले असले तरी अकोला जिल्हा व गुजरात या ठिकाणी विक्री होत असलेल्या कापसाच्या दराच्या तुलनेत जिल्ह्यात कापसाचे दर कमी आहेत. अकोल्यात कापसाचे दर ८ हजार २०० रुपयांवर गेले आहेत. याबाबत कॉटन व्यवसायातील जाणकारांच्या माहितीनुसार जळगाव जिल्ह्यातील कापसाचा उतारा हा यंदाच्या हंगामातील कापसाचे दर ३३ टक्के इतका आहे. तर अकोल्यासह विदर्भातील कापसाचा उतारा हा ३६ ते ३७ पर्यंत आहे. त्यामुळे व्यापारी व जिनर्सकडून अशा कापसाला चांगला भाव दिला जात आहे
काही शेतकरी खासगी व्यापाऱ्यांना माल विक्री करीत आहेत. आतापर्यंत १३ लाख गाठींची खरेदी खान्देशात झाली असल्याची माहिती जाणकारांनी दिली. २५ टक्के माल अद्याप शेतकऱ्यांच्या घरात आहे त्यापैकी केवल १० ते ५ टक्केच माल यंदा विक्रीला येऊ शकतो असाही अंदाज आहे. मात्र उर्वरित माल शेतकरी यंदाच्या हंगामात विक्री करणार नाही, असा अंदाजही कॉटन बाजारातील जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे