जळगाव लाईव्ह न्यूज । २६ मे २०२१ । गेल्या काही दिवसापासून जळगाव जिल्ह्यातील कोरोना बाधित रुग्णांची संख्या घटू लागली असताना आता राज्यातील सर्वात कमी पॉझिटीव्हीटी दरात जळगाव जिल्हा दुस-या क्रमांकावर असल्याचे ताज्या आकडेवारीतून अधोरेखीत झाले आहे. राज्याच्या आरोग्य विभागाने आज विविध जिल्ह्यांमध्ये संसर्गाचे प्रमाण अर्थात पॉझिटीव्हीटीचा दर नेमका किती आहे याची आकडेवारी जाहीर केली आहे.
गेल्या दीड ते दोन महिन्यापूर्वी राज्यासह जळगाव जिल्ह्यात कोरोना संसर्गाने थैमान घातले होते. जळगाव जिल्ह्यात दररोज १ हजार ते १२०० रुग्ण आढळून येत होते. याच पार्श्वभूमीवर जिल्ह्यात कडक निर्बंध लावण्यात आले. जिल्ह्यात कोरोना नियमांचे काटेकोर पालन करत असल्याने मागील काही दिवसापासून जिल्ह्यातील कोरोना करोनाबाधितांची संख्या वेगाने कमी होत आहे.
गेल्या आठवड्यात जळगाव जिल्ह्याचा कोरोना पाॅझिटीव्हीटी दर अवघा 3.83 %.वर आला आहे. जिल्ह्याचा पॉझिटीव्हीटीचा दर हा राज्यातील दुस-या स्थानी आहे तर भंडारा जिल्हा 3.44% पहिल्या स्थानी आहे. राज्यातील सरासरी पॉझिटीव्हीटीचा दर हा तब्बल ११.०६ टक्के आहे. तर अनेक जिल्ह्यांमध्ये मोठ्या प्रमाणात संसर्ग आढळून येत आहे. अगदी सातार्यात तर २१.९३ टक्के इतका पॉझिटीव्हीटीचा दर आहे. या पार्श्वभूमिवर, जळगाव जिल्ह्यातील कोरोनाचा संसर्ग हा आटोक्यात आल्याचे दिसून येत आहे.