जळगाव लाईव्ह न्यूज । १७ नोव्हेंबर २०२५ । उत्तर भारतात थंडीची लाट असून वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या जळगावसह अनेक जिल्ह्यांत थंडीची लाट अधिक तीव्र झाली. सकाळी आणि रात्री हुडहुडी भरवणारी थंडी जळगावकरांना जाणवत असून आगामी तीन दिवस थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.

जळगाव शहरासह जिल्ह्यात १७ ते २० नोव्हेंबरदरम्यान थंडी वाढल्याने पारा २ ते ३ अंशांनी घसरून गारठा अनुभवायला मिळेल; मात्र दिवसा विशेषतः दुपारी तापमानात फारशी घट नसेल. रविवार, १६ नोव्हेंबर रोजी पहाटे तापमान ८ अंशांवर असताना, १५ ते २० किमी वेगाने वाहणाऱ्या थंड वाऱ्यांमुळे शहरात गारठा अधिकच वाढलेला जाणवत होता. दरम्यान, कोरड्या हवामानामुळे ही थंडीची तीव्रता वाढली असून, नागरिकांना ऊब घेण्यासाठी शेकोट्यांचा आधार घ्यावा लागत आहे.

यावर्षी नोव्हेंबरच्या प्रारंभीदेखील थंडीचा मागमूस नव्हता; मात्र आठवडाभरापासून अचानक थंडी पडू लागली. मागच्या काही दिवसापासून जिल्ह्यातील किमान पारा १० अंशाखाली असल्याने थंडीचा कडाका कायम आहे. अशातच आगामी तीन दिवस थंडीची ही लाट कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
दरम्यान, वेस्टर्न डिस्टर्बन्सची सक्रियता कमी असल्याने आणि उत्तर-पश्चिमी थंड वाऱ्यांमुळे रात्री हवेतील उष्णता बाहेर पडते. ज्यामुळे किमान तापमान कमी होते थंडी वाढते. दुपारी मात्र थेट सूर्यप्रकाश पडतो. चक्रीय बदलांमुळे तापमानात फारशी वाढ होत नसली तरी, उबदारपणाची जाणीव होते, असे अभ्यासक यांनी सांगितले.







