जळगाव लाईव्ह न्यूज । ३ सप्टेंबर २०२४ । लाचखोरी सारख्या घटना काही कमी होताना दिसत नसून अशातच जळगावमध्ये नाशिक येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई केली. जळगाव येथील भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या जळगावातील अवसायकासह वसुली अधिकार्याला दिड लाख रुपयांची लाच स्वीकारताना आज ३ सप्टेंबर रोजी सायंकाळी अटक केली.
चैतन्य हरिभाऊ नासरे (वय ५७, मूळ रा. गांधीनगर, नागपूर) असे अटकेतील अवसायकाचे तर सुनील गोपीचंद पाटील (वय ५४, रा. गुजराल पेट्रोल पंप जवळ, जळगाव) असे वसुली अधिकार्याचे नाव असे लाचखोरांचे नाव असून या कारवाईने मोठी खळबळ उडाली आहे.
काय आहे नेमका प्रकार?
या घटनेबाबत असे की, ४३ वर्षीय तक्रारदार यांची आई व मोठा सख्खा भाऊ यांनी भाईचंद हिराचंद रायसोनी मल्टीस्टेट को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेडमधून कर्ज घेतले होते. त्यांनी या कर्जाचे वेळोवेळी हप्ते भरले असून त्यांची आई व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या कर्ज रक्कमेची एक रक्कमी (वन टाईम सेटलमेंट) किती रक्कम भरावी लागेल? याची चौकशी करण्यासाठी तक्रारदार हे जळगवातील संस्थेच्या मुख्य कार्यालयात गेले होते.
वसुली अधिकारी सुनील पाटील यांनी तक्रारदार यांच्या आई व व भाऊ यांच्याकडे थकीत असलेल्या किंवा वसूल करावयाच्या मुद्दल कर्ज रकमेच्या पाच टक्के रक्कम भरण्याची अवसायक चैतन्य नासरे यांच्याकडून परवानगी देण्याच्या मोबदल्यात दोघांसाठी दिड लाख रुपयांची लाच १४ ऑगस्ट २०२४ रोजी मागितली होती व लाच रक्कमेत तडजोड होणार नसल्याचेही तक्रारदाराला बजावल्यानंतर त्यांनी नाशिक लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार नोंदवली.
लाच पडताळणीनंतर सापळा रचण्यात आला. संशयित आरोपी अवसायक चैतन्य नासरे यांनी लाच रक्कम संशयित आरोपी सुनील पाटील यांच्याकडे सुपूर्द करण्यास सांगितल्यानंतर आज मंगळवारी सायंकाळी तक्रारदाराने रक्कम दिली व लागलीच एसीबीने दोघांना अटक केली. या कारवाईने मोठी खळबळ उडाली.