जळगावात मांजा विक्रीसह वापर करणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई; ८ जण ताब्यात
जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरात मकर संक्रांतीच्या तयारीत नायलॉन मांजा विक्री आणि वापर करणाऱ्यांवर पोलिसांकडून मोहीम राबविण्यात येत असून याच दरम्यान छापेमारी करून ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. आणि त्यांच्याकडून नायलॉन मांजा जप्त करण्यात आला आहे.
खरंतर सरकारने पंतग उडविण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या नायलॉन मांजाच्या विक्रीवर बंदी घातली आहे. तरी देखील या नायलॉन मांजाची चोरीछुपे विक्री केली जात असून यामुळे मानवी जीवनासह पक्षी आणि इतर प्राण्यांसाठीही धोकादायक आहे.मात्र, काही लोक अजूनही चोरून नायलॉन मांजा विक्री करत असल्याचे दिसून येते.
याच पार्श्वभूमीवर जळगावात पतंग उडवण्यासाठी प्रतिबंधीत नायलॉन मांजाचा वापर करणारांविरुध्द कडक कारवाया करणेबाबत पोलीस अधीक्षक डॉ.महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते, उपविभागीय पोलीस अधिकारी संदीप गावीत यांनी सुचना केलेल्या होत्या.
पोलिसांनी जळगावात दिनांक १३ आणि १४ जानेवारी रोजी छापेमारी करून कारवाई दरम्यान मयुर दत्तु भोई (वय २३ वर्षे, रा.सदगुरुनगर), भुषण गजानन बेलेकर (वय २४ वर्षे, रा.डि.एन.सी.कॉलेज जवळ), अफवान निहाल खान (वय २४ वर्षे, रा.काट्याफाईल बटाटा गल्ली), परवेझ शेख शफी शेख (वय २४ वर्षे, रा.काट्याफाईल बटाटा गल्ली), दर्शन संजय शिंपी (वय १९ वर्षे, रा.आशाबाबनगर महादेव मंदीरासमोर), गितेश भरत सैंदाने (वय १८ वर्षे, रा. आशाबाबानगर), प्रतिक ज्ञानेश्वर पांडुळे (वय २१ वर्षे, रा.रामेश्वर कॉलनी) आणि तुषार सुनिल माळी (वय २३ वर्षे, रा.विठोबानगर जुना खेडी रोड) या ८ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे. सर्वांकडून ११ नायलॉन मांजाच्या चक्री जप्त करण्यात आलेल्या आहेत.
ड्रोनद्वारे पाहणी
नायलॉन मांजा वापर आणि विक्री करणाऱ्यांवर ड्रोनद्वारे लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी दिली आहे. या मोहिमेत पुढील २ दिवस देखील अशीच कारवाई राबवण्यात येणार आहे.