जयदीप पाटीलांना लोकमान्य संस्कृत विद्यापीठातर्फे मानद डि.लीट पदवी प्रदान
जळगाव लाईव्ह न्यूज । १२ जून २०२४ । गेल्या एक दशकहुन अधिक काळ विज्ञान तंत्रज्ञान व शिक्षण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोबेल फाउंडेशन या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष जयदीप पाटील यांना काल लोकमान्य संस्कृत विद्यापीठ नाशिक तर्फे विज्ञान क्षेत्रातील कार्याबद्दल मानध डिलीट पदवी प्रदान करण्यात आली. विद्यापीठाचे कुलपती पंडित शास्त्री मनोहर सुकेनकर,बनारस हिंदू विद्यापीठाचे संस्कृत व कला विभागाचे अधिष्ठाता डॉ. राजेश सरकार, दाते पंचांग चे डॉ. अनंत दाते,कुलसचिव डॉ.प्रसाद कुलकर्णी यांच्या उपस्थितीत जयदीप पाटील यांना सपत्नीक पदवी प्रदान करण्यात आली. अखिल भारतीय मराठी संस्कृत साहित्य संमेलनात येवला येथे हा सन्मान सोहळा पार पडला. 1998 पासून देशात संस्कृत विषयाच्या प्रसारासाठी लोकमान्य संस्कृत विद्यापीठ हे स्वायत्त विद्यापीठ कार्य करीत आहे.
धरणगाव तालुक्यातील कल्याणेहोळ या छोट्याशा गावातून शेतकरी कुटुंबात जयदीप पाटील यांचा जन्म झाला.अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून त्यांनी शिक्षण क्षेत्रात स्वतःचे वेगळे स्थान निर्माण केले. नोबेल फाउंडेशनच्या माध्यमातून विज्ञान व तंत्रज्ञान विषयक जागरूकता,ग्रामीण भागातील शेकडो विद्यार्थ्यांना करिअरसाठी मार्गदर्शन, दीड हजाराहून अधिक व्याख्याने त्यांनी दिलेली आहेत. यासह ग्रामीण भागातील 600 हून अधिक विद्यार्थ्यांना भारतीय अवकाश संशोधन संस्था तसेच आयआयटी सारख्या उच्च शिक्षण संस्थांची विनामूल्य सफर घडवून आणलेली आहे. विज्ञान विषयक लिखाण आणि व्याख्याने यातून लाखो विद्यार्थ्यांचे प्रबोधन केलेले आहे.त्यांच्या या यशाबद्दल संपूर्ण जिल्ह्यात आनंदाचे वातावरण आहे. याबाबत प्रतिक्रिया देताना जयदीप पाटील म्हणाले की विज्ञान क्षेत्रात गेल्या दशकापासून कार्य करीत असलेल्या माझ्या सर्व सहकारी विद्यार्थी पालक व शिक्षकांचे हे यश आहे माझ्यासारख्या ग्रामीण भागातून आलेल्या तरुणाला समाजाने दिलेला हा आशीर्वाद आहे यामुळे पुढील कार्यकर्त्यासाठी मोठी प्रेरणा मिळालेली आहे. हा सन्मान आई वडिल,परिवार व माझ्या विद्यार्थ्यांना अर्पण करतो.”
जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन, माजी कुलगुरू डॉ. के. बी. पाटील,प्र कुलगुरू डॉ. प्रमोद माहूलीकर,ज्येष्ठ सनदी अधिकारी राजेश पाटील ,डॉ. संग्राम पाटील , आदिवासी उपायुक्त कपिल पवार, सामाजिक कार्यकर्ते रमेश पाटील,जैन समूहाचे मीडिया उपाध्यक्ष अनिल जोशी ,प्रताप महाविद्यालयाचे अध्यक्ष नीरज अग्रवाल आदींनी अभिनंदन केले.