⁠ 
सोमवार, मे 6, 2024

जय भोलेनाथ : जाणून घ्या… काय आहे ‘शिरवेल महादेव’ची आख्यायिका

जळगाव लाईव्ह न्यूज । चेतन वाणी । महाराष्ट्राच्या सीमेपासून २२ किलोमीटर तर मध्यप्रदेशातील खरगोनपासून ५५ किलोमीटर अंतरावर जंगलात, डोंगराच्या कुशीत असलेले भाविकांचे श्रद्धास्थान ‘शिरवेल महादेव मंदिर’. श्रावण महिन्यातील सोमवारी या स्वयंभू महादेवाचे दर्शन घेण्यासाठी जळगाव जिल्ह्यातील तसेच महाराष्ट्र व गुजरातसह देशभरातील असंख्य भाविक येत असतात. शिरवेल महादेव जातांना आणि त्याठिकाणी असलेला निसर्ग प्रत्येकाला आकर्षित करीत असतो.

महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्याच्या सीमेपासून अवघ्या २२ किलोमीटर असलेल्या मध्यप्रदेशातल्या खरगोन जिल्ह्यातील शिरवेल येथील महादेव संस्थान आहे. सातपुड्याच्या पर्वतरांगांमध्ये वसलेले शिरवेल महादेवाचे मंदिर महाराष्ट्र मध्यप्रदेश गुजरात येथील पर्यटक व शिवभक्तांसाठी विशेष आकर्षण आहे. सातपुड्याच्या पर्वत रांगातून नयनरम्य असलेल्या परिसर पर्यटकांचे व भाविकांचे डोळ्यांचे पारणे फेडण्यासाठी सज्ज आहे.

महाराष्ट्रभरातून येणारा भाविकांची संख्या या ठिकाणी अधिक असते. तसेच मध्यप्रदेश गुजरात या राज्यातील ही अनेक भाविक व पर्यटक याठिकाणी येतात. इथल्या मनमोहक व नयनरम्य असा परिसर भाविकांना व पर्यटकांना आकर्षित करतो.

अशी आहे आख्यायिका

पुराणाच्या मान्यतेनुसार याठिकाणी रावणाने शिवाची तपश्चर्या करून महादेवाला प्रसन्न केले होते. रावणाने आपले दहा शीर महादेवाला अर्पण केल्याची आख्यायिका आहे. त्यावरूनच या स्थानाचे नाव शिरवेल (सिरवेल) असे पडले आहे. येथे असलेले शिवलिंग हे देखील स्वयंभू असल्याने याठिकाणी केले जाणारे नवस हे पूर्ण होतात. अशी भाविकांची श्रद्धा आहे.

खडतर प्रवास.. हिरवळीची चादर.. खळखळणारा धबधबा

शिरवेल महादेव येथे जाण्यासाठी सातपुड्याच्या पर्वतरांगेतून अतिशय खडतर प्रवास करून जावे लागते. वळणावळणाच्या घाटातून जाताना चौफेर हिरवळीची चादर पसरलेली पहावयास मिळते. पर्वत रांगांच्या मध्यवस्तीत वसलेले व आदीवासी बहुल भागात हे स्थान आहे. शिरवेल महादेव मंदिराशेजारीच भव्य धबधबा असून तो पुढे कुंदा नदीला जाऊन मिळतो. कुंदा नदीचा उगम याच ठिकाणी होतो असे म्हटले जाते. धो-धो कोसळत असलेल्या धबधबामुळे पर्यटक व शिवभक्त या निसर्गरम्य वातावरणाचा आनंद घेत असतात. कोरोना काळात घरात बसून वैतागलेल्या पर्यटकांसाठी शिरवेल महादेव एक पर्वणीच आहे.