⁠ 
शनिवार, नोव्हेंबर 23, 2024
Home | जळगाव जिल्हा | भुसावळ | दीपनगर प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यासह शेती व पाणी धोक्यात आहे का?

दीपनगर प्रकल्पामुळे नागरिकांच्या आरोग्यासह शेती व पाणी धोक्यात आहे का?

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । ३१ डिसेंबर २०२२ । भुसावळ (दीपनगर)औष्णिक विद्युत केंद्रातील राखेच्या पाईपलाईनव्दारे राख मिश्रित पाणी सोडून तेथील सिंचन योजना उद्ध्वस्त होत असल्याने या प्रकरणाची उच्चस्तरिय चौकशी करण्यात येईल, अशी घोषणाा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे. राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते आमदार एकनाथराव खडसे यांनी हा मुद्दा सभागृहात उपस्थित केला होता. भुसावळ आष्णिक विद्युत केंद्रांच्या युनिक क्रमांक तीनची प्रकल्प मर्यादा संपलेली असूनही या केंद्रातून वीजनिर्मिती होत असल्याची तक्रार झाली असून याचीही चौकशी होणार असल्याचे आश्‍वासन फडणवीस यांनी दिले आहे. या निमित्ताने दीपनगर औष्णिक केंद्रामुळे होणार्‍या प्रदूषणाचा मुद्दा पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.

दीपनगरमध्ये १९६८ पासून वीज निर्मिती
दीपनगरमध्ये जुलै १९६८ मध्ये ६५ मेगावॉट स्थापित क्षमतेच्या संच क्रमांक १ ची मुहूर्तमेढ रोवली गेली. ऑगस्ट १९७९ मध्ये २१० मेगावॉट स्थापित क्षमतेचा संच क्र. २, तर सप्टेंबर १९८२ मध्ये २१० मेगावॉटचा संच क्र. ३ कार्यान्वित झाला. नोव्हेंबर २०१२ व जानेवारी २०१४ मध्ये ५०० मेगावॉटचे दोन संच कार्यान्वित झाल्याने दीपनगरची स्थापित क्षमता एक हजार ४२० मेगावॉट झाली होती. मागील काळात ६५ मेगावॉटचा संच क्र. १ व २१० मेगावॉट स्थापित क्षमतेचा संच क्र. २ व ३ हे कायमस्वरूपी बंद करण्यात आलेत. आता प्रत्येकी ५०० मेगावॉटचे संच क्र. ४ व ५ यामधून वीजनिर्मिती करण्यात येत आहे. सध्या केंद्राची स्थापित क्षमता एक हजार मेगावॅट आहे.

शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान
दीपनगर औष्णिक केंद्रातून बाहेर पडणार्‍या राखेमुळे हवेतील प्रदूषणाचे प्रमाण मोठे असते. या भागातील शेतकर्‍यांना याचा मोठा फटका बसतो. गेल्या काही वर्षांपूर्वीपर्यंत हे प्रमाण खूप होते. मात्र, मागील वर्षात संच क्रमांक १, २ व ३ बंद झाल्याने प्रदूषण काहीसे कमी आहे. सन २०१२मध्ये मंजुरी मिळालेल्या ६६० मेगावॉट सुपर क्रिटिकल कोळसाधिष्ठित या नवीन तंत्रज्ञानावर आधारित प्रकल्पाच्या चिमणीतून राखच नव्हे तर अन्य फ्लू गॅसदेखील वातावरणात सोडले जाणार नाहीत, असे दावा करण्यात येत होता. मात्र ही समस्या अजूनही कायम आहे. सध्या वायू प्रदूषण कमी झाले असले तरी राख मिश्रित पाण्यामुळे जलप्रदूषण वाढले आहे. यामुळे सिंचनाचा मोठा प्रश्‍न उपस्थित होत आहे. याच मुद्द्यावर आमदार खडसे यांनी बोट ठेवले आहे.

श्वसनासंबंधी गंभीर विकार होण्याची दाट शक्यता
औष्णिक विदयुतनिर्मितीमध्ये कोळसा हे जीवाश्म इंधन वापरतात. कोळशाचे ज्वलन करून निर्माण झालेल्या उष्णता ऊर्जेचा उपयोग करून विद्युत निर्मिती केली जाते. कोळशाच्या ज्वलनाने कार्बन डायऑक्साइड, सल्फर डायऑक्साइड, नायट्रोजन ऑक्साइड यांसारखे हानिकारक आणि आरोग्यास घातक वायू वातावरणात उत्सर्जित होतात. इंधनाचे सूक्ष्म कण वातावरणात सोडले जातात या घनरूप कणांमुळे श्वसनसंस्थेचे गंभीर विकार उद्भवू शकतात. औष्णिक वीज प्रकल्पांमधून बाहेर टाकल्या जाणार्‍या घटकांमध्ये नायट्रोजन डायऑक्साइड श्वसनाशी संबंधित विकार होण्यास कारणीभूत ठरतात. तर सल्फर डायऑक्साइड व उत्सर्जनातून निघणारे इतर काही वायू फुप्फुसांसाठी अत्यंत घातक ठरतात.

महाराष्ट्रातील औष्णिक विद्युत प्रकल्प
पारस(जि. अकोला)
परळी वैजनाथ(जि. बीड)
भुसावळ(जि. जळगाव)
खापरखेडा(जि. नागपूर)
कोराडी(जि. नागपूर)
चंद्रपूर(जि. चंद्रपूर्)
डहाणू(जि. ठाणे?)
एकलहरे(जि. नाशिक)
दाभोळ (जि. रत्नागिरी)
तुर्भे (मुंबई)

author avatar
डॉ. युवराज परदेशी
पत्रकारिता क्षेत्रात गत १८ वर्षांपासून कार्यरत. कॉर्पोरेट कम्युनिकेशन व लॉबिंग या विषयावर पीएच.डी.चे संशोधन. संशोधनात्मक लेखनात विशेष प्राविण्य. राजकारण, उद्योग जगत, आर्थिक घडामोडी, स्टार्टअप, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे विश्‍लेषण तज्ञ. तीन पुस्तके प्रकाशित. दैनिक लोकसत्ता, दैनिक देशदूत मधील कामासह महाराष्ट्र विधीमंडळ वार्तांकनाचा दीर्घ अनुभव. दैनिक जनशक्तीचे माजी निवासी संपादक.