जळगाव लाईव्ह न्यूज । १७ एप्रिल २०२२ । सध्या आयपीएल सुरू असून देशभरात अनेक ठिकाणी आयपीएलवर सट्टा खेळला जात असल्याचे प्रकार उघड होत आहे. जळगाव शहरात आयपीएलवर सट्टा घेणाऱ्यांवर सहाय्यक अधिक्षकांच्या पथकाने एमआयडीसी पोलिसांच्या मदतीने फातेमा नगरात छापा टाकला. पथकाने केलेल्या कारवाईत तिघांना ताब्यात घेण्यात आले असून मोबाईल आणि रोकड जप्त करण्यात आली आहे.
जळगावातील फातेमा नगरात आयपीएल मॅचेसवर सट्टा घेतला जात असल्याची माहिती सहाय्यक अधीक्षक कुमार चिंथा यांच्या पथकाला मिळाली होती. रविवारी सायंकाळी जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे सहाय्यक निरीक्षक किशोर पवार, मीनल साकळीकर, रवींद्र मोतीराया, महेश महाले यांच्या पथकासह एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक प्रताप शिकारे यांच्या पथकातील अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, सचिन पाटील, योगेश बारी यांनी आयेशा किराणाजवळ छापा टाकला.
पथकाने केलेल्या कारवाईत इम्रान अमीन खान वय-४० रा.चिखली ह.मु.फातेमा नगर, वसीम सैय्यद कामरोद्दीन वय-३८, जावेद नबी शेख वय-३० रा.फातेमा नगर यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्याकडून ४० हजार ६०० रुपये रोख आणि ५ मोबाईल हस्तगत करण्यात आले. जळगावात यंदाच्या आयपीएलमध्ये करण्यात आलेली ही पहिलीच कारवाई आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास पोलीस नाईक इम्रान सैय्यद करीत आहे.