आंतरराष्ट्रीय योग दिन रेल्वे मैदानावर उत्साहात साजरा

जून 21, 2025 12:02 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जून २०२५ । आयुष मंत्रालय, युवा कार्य व क्रीडा मंत्रालय (भारत सरकार), मध्य रेल्वे विभाग भुसावळ आणि जिल्हा प्रशासन, जळगाव यांच्या संयुक्त विद्यमाने आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्ताने दिनांक २१ जून रोजी “एक पृथ्वी, एक आरोग्य” या संकल्पनेवर आधारित भव्य योग सत्राचे आयोजन भुसावळ येथील पथज्योत रेल्वे क्रीडांगणावर करण्यात आले. या कार्यक्रमात विविध स्तरांतील नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग लाभला.

yog day

योग शिक्षिका श्रीमती चंचल माळी, डॉ. आदित्य व डॉ. शरयू यांनी विविध योगासने प्रत्यक्ष प्रात्यक्षिकासह सादर करत योगाचे आरोग्यदायी फायदे विशद केले. त्यांनी सांगितले की, योग हा केवळ व्यायाम नसून जीवनशैलीचा अविभाज्य भाग आहे. तो तणावमुक्त जीवनासाठी उपयुक्त असून मानसिक संतुलन व आत्मिक शांती साधणारा मार्ग आहे.

या योग सत्रात प्राणायाम, विविध योगासनं आणि ध्यानधारणा यांचा समावेश होता. उपस्थितांनी शिस्तबद्ध पद्धतीने सहभाग नोंदवून कार्यक्रमात एकरूपता साधली. ‘नियमित योगाभ्यास करा, निरोगी आयुष्य जगा’ हा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.योग शरीर, मन आणि आत्मा यांच्यात समतोल निर्माण करतो. नियमित योगाभ्यासामुळे शारीरिक आरोग्य, मानसिक शांतता, आत्मिक समाधान आणि सकारात्मकता वाढते. त्यामुळे योग जीवनशैलीचा अविभाज्य भाग बनवावा, असे आवाहन केंद्रिय क्रीडा व युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे यांनी केले. यावेळी राज्याचे वस्रोद्योग मंत्री संजय सावकारे यांनीही योगाचे महत्व विशद केले.

भुसावळ विभागातील विविध रेल्वे डेपो, कार्यशाळा आणि कार्यालयांमध्येही योग दिन उत्साहात साजरा करण्यात आला. जिल्हा प्रशासनाने व रेल्वे विभागाने सोशल मीडियाच्या माध्यमातून योगाचे फायदे आणि योग दिनाचे महत्त्व अधोरेखित करणारे संदेश प्रसारित करून व्यापक जनजागृती घडवून आणली. भुसावळ विभाग आणि जिल्हा प्रशासनाच्या संयुक्त प्रयत्नातून हा कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पडल्याबद्दल उपस्थितांनी समाधान व्यक्त केले. यावेळी आंध्रप्रदेशातूतील विशाखापट्टनम येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत 11 वा आंतरराष्ट्रीय योग दिवस आयोजित करण्यात आला होता. दूरदृष्य प्रणालीद्वारे भव्य पडद्यावर या ठिकाणी दाखविण्यात आला.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now

Leave a Comment