जळगाव लाईव्ह न्यूज । २४ मार्च २०२२ । शालेय शिक्षणातील विषय, अभ्यासाचे टेन्शन, स्वच्छता अशा अनेक विषयांवर बालकलावंतांनी छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सुरु असलेल्या १८ व्या महाराष्ट्र राज्य बालनाट्य स्पर्धेच्या दुसऱ्या व अखेरच्या दिवशी सादरीकरण करुन प्रेक्षकांना अचंबित केले.
दुसऱ्या दिवशी सकाळी शेठ ला.ना.सार्वजनिक विद्यालय जळगाव यांचे अमोल संगीता अरुण लिखीत उल्हास ठाकरे दिग्दर्शित द बटरफ्लाईज, श्री फाऊंडेशन वरणगाव यांचे गणेशसिंग मरोड लिखीत अजय पाटील दिग्दर्शित शोध अस्तित्वाचा, सातपुडा शैक्षणिक व सामाजिक संस्था शहादा यांचे ऋषिकेश तुराई लिखीत रोहिणी निकुंभ दिग्दर्शित म्याडम, श्री समर्थ मठ संस्थान, इंदौर यांचे उषा चोरघडे लिखीत – दिग्दर्शित बंद पुस्तक, श्री संत ज्ञानेश्वर शिक्षण मंडळ भुसावळ यांचे विनोद उबाळे लिखीत, सोनाली वासकर दिग्दर्शित नाते तुझे नि माझे, वर्धमान युनिव्हर्स ॲकॅडमी, जळगाव यांचे वैभव मावळे लिखीत, आकाश बाविस्कर दिग्दर्शित आई मला छोटीशी बंदूक दे ना, विद्या फाऊंडेशन जळगाव यांचे ॲड.शैलेश गोजमगुंडे लिखीत, विशाल जाधव दिग्दर्शित सांबरी या बालनाट्यांचे सादरीकरण झाले.
सातवे बालनाट्य सादर झाल्यानंतर रंगकर्मी, प्रेक्षक व स्पर्धेचे परीक्षक गोविंदा गोडबोले (सांगली), नवीनी कुलकर्णी (मुंबई), सुषमा मोरे (नागपूर) यांच्या उपस्थितीत स्पर्धेचा छोटेखानी समारोप करण्यात आला. यावेळी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैशाली पाटील यांनी तर आभार स्पर्धेचे समन्वयक दिपक पाटील यांनी मानले.