पोलिसांनो खाकी वर्दीत असताना मिरवणुकांमध्ये नाचताय? आधी वाचा पोलीस महासंचालक कार्यालयाने दिलेल्या ‘या’ सूचना
जळगाव लाईव्ह न्यूज । २० सप्टेंबर २०२२ । कोरोनाच्या दोन वर्षांनंतर यंदा गणेशोत्सव जल्लोषात साजरा झाला. या दरम्यान, गणेश विसर्जनाच्या मिरवणुकांमध्ये पोलिसांनी देखील ठेका धरला असल्याचे अनेक व्हिडीओ समोर आले होत. त्यामुळे खाकी वर्दीतील पोलीस नाचल्यामुळे वादंग निर्माण झाला होता. पोलिसांची ही कृती योग्य होती किंवा नव्हती, यावरुन वादविवाद सुरु आहेत. या पार्श्वभूमीवर पोलीस महासंचालक कार्यालयाकडून महत्त्वाच्या सूचना जारी करण्यात आल्या आहेत.
पोलिसांनी खाकी वर्दी अंगावर असताना मिरवणुकांमध्ये नाचता कामा नये, त्यांना तशी परवानगी नाही. हे कृत्य अवमानकारक आणि अक्षम्य आहे, असे अतिरिक्त पोलीस महासंचालक कुलवंत सरंगळ यांनी म्हटले आहे. याशिवाय अनेक ठिकाणी पोलीस अधिकारी वैयक्तिक पातळीवर भाषण देतानाही दिसून आले आहेत.
तर काही ठिकाणी पोलीस ढोल वाजवत होते. याची दखल पोलीस मुख्यालयाने दखल घेत पोलीस अधीक्षक स्तरावरील अधिकाऱ्याला याबाबत अहवाल सादर करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर आता बंदोबस्ताला तैनात असताना अशा प्रकारे कोणत्याही धार्मिक अथवा सार्वजनिक कार्यक्रमात सहभागी न होण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.