⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजेंची मोठी घोषणा

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ मे २०२२ । राज्यसभा निवडणुकीबाबत छत्रपती संभाजीराजे यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली आहे. छत्रपती संभाजीराजे यांनी राज्यसभा निवडणुकीत उभे राहणार नसल्याची घोषणा केली आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांनी मला दिलेला शब्द मोडला. या गोष्टीचं मला प्रचंड वाईट वाटत आहे, असे संभाजीराजे छत्रपती (Sambhajiraje Chhatrapati) यांनी सांगितले.

गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री, शिवसेनेचे मंत्री आणि एक खासदार यांच्याशी माझी चर्चा सुरु होती. त्यांच्या सूचना, माझ्या सूचनांचा एक सविस्तर ड्राफ्टही तयार झाला होता. तो ड्राफ्ट पाहून मी कोल्हापुरलाही निघालो होतो. मात्र अचानक संपूर्ण डाव उलटला आणि संजय पवार यांच्या उमेदवारीच्या बातम्या येऊ लागल्या. माझ्यासाठी हा मोठा धक्का ठरला. एक निष्पक्ष नेता म्हणून मी आतापर्यंत समाजाची सेवा केली, मात्र माझी विनंती फेटाळण्यात आली, अशी नाराजी व्यक्त करत संभाजीराजेंनी राज्यसभेच्या निवडणुकीला उभे राहणार नाही, अशी घोषणा केली. मात्र स्वराज्य संघटनेमार्फत समाजाची सेवा करत राहणार असल्याचंही त्यांनी सांगितलं.

उद्धव ठाकरे यांनी सुरुवातीला मला भेटण्यासाठी दोन खासदारांना पाठवले होते. मुंबईतील ओबेरॉय हॉटेलमध्ये आमची बैठक झाली होती. त्यावेळी मी शिवसेनेत प्रवेश करावा, असा प्रस्ताव खासदारांनी मांडला. तेव्हा मी त्यांना स्पष्टपणे नकार दिला. मी राज्यसभेची निवडणूक अपक्ष म्हणूनच लढणार, असे मी त्यांना सांगितले. त्यानंतर दोन दिवसांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मला फोन केला. त्यांनी मला वर्षा बंगल्यावर भेटायला बोलावले. मी मुख्यमंत्रीपदाचा मान राखून उद्धव ठाकरे यांना भेटायला गेलो. त्यावेळी आमच्यात तीन मुद्द्यांवर चर्चा झाली. तेव्हाही उद्धव ठाकरे यांनी मला, ‘छत्रपती आमच्यासोबत हवेत’, अशी इच्छा व्यक्त केली. तेव्हादेखील मी अपक्ष म्हणून लढणारच, असे स्पष्ट केल्याचे संभाजीराजे यांनी सांगितले.