गुलाबराव देवकरांना धक्का ! 10 कोटींच्या कर्जाची रक्कम तत्काळ एकरकमी वसूल करण्याचे निर्देश

ऑगस्ट 19, 2025 10:58 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १९ ऑगस्ट २०२५ । माजी मंत्री गुलाबराव देवकर (Gulabrao Deokar) यांना धक्का देणारी बातमी असून जळगाव (Jalgaon) जिल्हा बँकेतून घेतलेल्या १० कोटींच्या कर्जाची रक्कम तत्काळ एकरकमी वसूल करण्यात यावी, असे आदेश जिल्हा उपनिबंधकांनी बँक व्यवस्थापनाला दिले. यामुळे राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

gulabrao deokar

विशेष गुलाबराव देवकर यांनी शरद पवार गटाची साथ सोडून अजितदादांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतरही त्यांच्यामागचे कर्ज वसुलीचे शुक्लकाष्ठ काही कमी झालेले नाही. देवकर यांच्याकडून कर्ज एकरकमी वसूल करण्याचे निर्देश जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाणे यांनी जिल्हा बँकेला दिले आहेत. यासंदर्भात त्यांनी कार्यकारी संचालकांना पत्र दिले आहे.

नेमकं प्रकरण काय?

माजी मंत्री देवकर हे २०२१-२२ मध्ये जळगाव जिल्हा सहकारी मध्यवर्ती बँकेचे अध्यक्ष होते. विशेष म्हणजे त्याच काळात ते श्रीकृष्ण शैक्षणिक आणि सांस्कृतिक मंडळाचेही अध्यक्ष होते. बँक नियमन कायदा १९४९ चे कलम २० प्रमाणे कोणत्याही पदाधिकाऱ्यास संचालक अथवा हितसंबंध असलेल्या कोणत्याही संस्थेस कर्ज मंजूर करण्यास प्रतिबंध आहे. तरीही देवकर यांनी त्यांच्या शैक्षणिक संस्थेच्या नावे तब्बल १० कोटी रूपयांचे कर्ज जिल्हा बँकेतून उचलले. त्यामुळे देवकर यांनी पदाचा गैरवापर करत स्वतःच्या संस्थेच्या नावे कर्ज मंजूर करून घेतल्याची तक्रार झुरखेडा (ता.धरणगाव) येथील विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेचे संचालक एस. जी. पाटील यांनी सहकार विभागाकडे केली होती.

त्या तक्रारीची चौकशी झाल्यानंतर कारवाईचे आदेश विभागीय आयुक्तांनी गेल्या महिन्यात दिले होते. एक महिन्यानंतर जिल्हा उपनिबंधक गौतम बलसाने यांनी जिल्हा बँकेचे कार्यकारी संचालकांना पत्र पाठवले आहे. त्यात या आदेशावर तात्काळ कार्यवाही करून कर्जाची एकरकमी वसुली करावी, असे आदेश दिले आहेत.

दरम्यान, आता उपनिबंधकांनी दिलेल्या आदेशानुसार कार्यवाही करण्यासंदर्भात बँकेच्या संचालक मंडळाच्या बैठकीत निर्णय घेतला जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे संचालक मंडळ काय निर्णय घेते, त्याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे.

देवकर म्हणतात ठरवून केले जातेय टार्गेट

या प्रकरणाविषयी गुलाबराव देवकर यांनी इतर संचालकांनीदेखील कर्ज घेतले आहे. मात्र, माझ्यावरच दबावातून कार्यवाही केली जात असल्याचा आरोप केला आहे. इतर संचालक सहकारी असल्याने मला ते बोलता येत नाही. मात्र, ठरवून माझ्याबाबत राजकारण केले जात आहे. या प्रकरणी राजकारण करता कामा नये. मी नियमानुसार कर्ज घेतले. नियमितपणे हप्ते फेडत आहे. दबावातून अशा प्रकारचे आदेश काढले जात आहेत. आधीच्या कार्यवाहीबाबत मला माहिती आहे, या नवीन नोटीसबाबत मला या प्रकरणी काहीही माहिती नाही, याबाबत जे नियमात असेल ते होईल, असेही त्यांनी स्पष्ट केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now