जळगावात पकडली देशी दारू; पावणे दोन लाखांचा मुद्देमाल जप्त
जळगाव लाईव्ह न्यूज । २० नोव्हेंबर २०२१ । देशी दारूची अवैधरित्या वाहतूक करणाऱ्या कारवर एमआयडीसी पोलिसांनी कारवाई करून १ लाख ७५ हजार ९२० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. गुरुवार दि.१८ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जळगाव शहरातील आर.एल चौफुलीवर ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
औरंगाबादकडून जळगावात येत असलेल्या एका कारमध्ये विना परवाना देशी दारूची अवैधरित्या वाहतूक होत असल्याची माहिती एमआयडीसी पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक प्रताप शिकारे यांना मिळाली होती. त्यानुसार सहाय्यक फौजदार अतुल वंजारी, इम्रान सैय्यद, गोविंदा पाटील, सचिन पाटील, साईनाथ मुंढे आदींच्या पथकाने गुरुवार दि.१८ रोजी रात्री ८.३० वाजेच्या सुमारास जळगाव-औरंगाबाद रस्त्यावरील आर.एल. चौकात सापळा रचला. यावेळी त्यांना एमएच.०१. व्हीए.६२१४ क्रमांकाची कार उभी दिसली. या कारची झडती घेतल्यानंतर या कारमध्ये २५ हजार ९२० रूपयांची देशी दारू आढळून आली.
चालकासह कार ताब्यात
एमआयडीसी पोलिसांच्या पथकाने या कारवाईत २५ हजार ९२० रूपयांची देशी दारू व कार असा १ लाख ७५ हजार ९२० रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. याप्रकरणी चंद्रकांत ईश्वर अहिरे (वय-४०, रा. रामनगर, मेहरूण) यास अटक करण्यात आली. सुधीर साळवे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.