जळगाव लाईव्ह न्यूज । १० फेब्रुवारी २०२४ । तुम्ही सरकारी कर्मचारी असाल तर तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी आहे. कारण भविष्य निर्वाह निधी संघटनेने पीएफ खातेधारकांना मिळणाऱ्या व्याजात वाढ केली आहे. माहितीनुसार, २०२३-२४ या आर्थिक वर्षासाठी ८.२५ टक्के दर निश्चित करण्यात आला आहे. म्हणजेच व्याजदर ०.१० टक्क्यांनी वाढले आहेत. शनिवारी झालेल्या सीबीटीच्या बैठकीत हा निर्णय आला आहे.
मात्र, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत अधिसूचना जारी करण्यात आलेली नाही. वाढीव व्याजदराला अर्थ मंत्रालयाकडून मंजुरी मिळाल्यानंतर सूचित केले जाणार आहे. यानंतर, EPFO द्वारे व्याजदराचे पैसे ग्राहकांच्या खात्यात जमा केले जाणार अशी माहिती सीबीटी बैठकीत हजर असलेल्या अधिकाऱ्यांनी दिली.
मात्र, व्याजदरात वाढ केल्यानंतर आता कर्मचाऱ्यांना पीएफवर तब्बल ८.१५ टक्के इतका व्याजदर मिळणार आहे. ईपीएफओने गेल्या वर्षी २८ मार्च रोजी २०२२-२३ साठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी खात्यांसाठी ८.१५ टक्के व्याजदर जाहीर केला होता. २०२०-२१ मध्ये हा व्याजदर ८.५% टक्क्यांवर होता.
२० किंवा त्याहून अधिक कर्मचारी असलेल्या कंपनीत पगारदार वर्गातील कर्मचाऱ्यांसाठी कर्मचारी भविष्य निर्वाह निधी (EPF) दिला जातो. कर्मचाऱ्यांच्या मासिक पगाराच्या १२ टक्के रक्कम ईपीएफ खात्यात गुंतवली जाते. त्याचप्रमाणे EPF मध्ये नियोक्त्याकडून समान योगदान दिले जाते. पीएफ खातेदाराच्या खात्यात जमा केलेली रक्कम EPFO अनेक ठिकाणी गुंतवते आणि या गुंतवणुकीतून मिळणाऱ्या कमाईचा एक भाग खातेदारांना व्याजाच्या स्वरूपात दिला जातो. या व्याजदरात आता वाढ झाल्यामुळे कोट्यवधी कर्मचाऱ्यांना याचा फायदा होणार आहे.