तिढा सुटला! आता मजुराला प्रती केळी घडाच्या वाहतुकीला मिळतील ‘इतके’ रुपये..
जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०२४ । केळीचे घड वाहतुकीसाठी जळगाव जिल्ह्यात ठिकठिकाणाहून मजूर येतात. परंतु, त्यांना घड वाहतुकीच्या बदल्यात केवळ आठ रुपये प्रती घड अशी मजूरी मिळते. महागाईत ही मजूरी त्यांच्या पोटा-पाण्यासाठी तटपुंजी ठरू लागली. त्यामुळे त्यांनी ८ ऐवजी १० रुपये प्रती घड दरवाढ करून मिळावे यासाठी काम बंद केले होते. परंतु, त्यांना अपेक्षित असलेले १० रुपये प्रती घड अशी वाढ मिळाल्यामुळे त्यांनी पुन्हा काम सुरू केले आहे.
केळी उत्पादक जिल्हा म्हणून जळगावची अवघ्या देशात ओळख झाली आहे, या जिल्ह्यात देशाच्या कानाकोपऱ्यातून केळीचे मोठे व्यापारी येत असून ते ट्रक संख्येच्या पटीने केळी खरेदी करतात. ते बाहेरुन येत असल्याने त्यांना घड वाहतुकीसाठी स्थानिक मजूरांची गरज भासते. रोजगाराच्या शोधात मजूर देखील ठिकठिकाणाहून येत आहे.
हे मजूर प्रती घड ८ रुपये प्रमाणे वाहतुक करुन देत होते. परंतु महागाईत मोठी वाढ झाल्यामुळे हा दर त्यांना परवडत नव्हता, त्यात त्यांच्या पोटापाण्याचा प्रश्न निर्माण होतो. त्यामुळे त्यांनी व्यापाऱ्यांकडून हा दर वाढवून मागितला, याबाबत व्यापाऱ्यांकडून अपेक्षित प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे मूजरांनी घड वाहतुकीचे काम बंद केले होते. मात्र, व्यापाऱ्यांनी हा दर वाढवून दिल्यामुळे त्यांच्यातील तिढा सुटला. पर्यायाने जल्ह्यातील बहुसंख्य शेतकऱ्यांचे संभाव्य नुकसानही टळले आहे.