जळगाव लाईव्ह न्यूज । २३ एप्रिल २०२२ । जळगाव जिल्ह्यात उमर्टी परिसरातून गावठी कट्टा येण्याचे प्रमाण सुरूच आहे. शुक्रवारी पोलीस महानिरीक्षक यांच्या विशेष पथकाने चोपडा पोलिसांच्या संयुक्त विद्यमाने केलेल्या कारवाईत २ जणांना अटक करण्यात आली असून दोघांनी पळ काढला आहे. पथकाने ५ गावठी कट्टे, १० जिवंत काडतुस, १ चारचाकी आणि २ मोबाईल असा ऐवज हस्तगत केला आहे.
मध्यप्रदेश-महाराष्ट्र सीमेलगत असलेल्या उमर्टी भागातून जळगाव जिल्ह्यात नेहमी गावठी पिस्तूल आणि काडतुस आणले जातात. जिल्ह्यात त्याची विक्री करणारे मोठे रॅकेट सक्रिय आहे. काही महिन्यांपूर्वी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक बी.जी.शेखर यांनी पोलीस अधीक्षक डॉ.प्रवीण मुंढे यांना मोहीम राबविण्याच्या सूचना केल्या होत्या. त्यानुसार एक विशेष पथक देखील तयार करण्यात आले आहे.
शनिवारी चोपडा ग्रामीण पो.स्टे. च्या हद्दीत काही तरुण गावठी पिस्तूल विक्रीसाठी येणार असल्याची माहिती पथकाला मिळाली होती. चोपडा पोलिसांसोबत संयुक्त कारवाई करून छापा टाकला. पथकाने केलेल्या कारवाईत मयूर काशिनाथ वाकडे रा.अरुणनगर, चोपडा, अक्रम शेरखान पठाण रा.हरसूल, औरंगाबाद यांना अटक करण्यात आली आहे. तसेच अरुण नवनाथ सोनवणे रा.निगडी, पुणे व कट्टे देणारा लाखनसिंग मोहसिंग बरनालारा रा.उमर्टी याने पळ काढला.
संशयितांकडून पथकाने १ लाख ५० हजारांचे ५ गावठी पिस्तूल, १० हजारांचे १० काडतूस, एक चारचाकी, २ मोबाईल असा ६ लाख ८० हजारांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
गावठी कट्टे पकफण्याची कारवाई विशेष पोलीस महानिरीक्षक यांचे पथकातील पोलीस निरीक्षक बापू रोहम, सहाय्यक निरीक्षक सचिन जाधव, सहाय्यक फौजदार बशीर तडवी, हवालदार रामचंद्र बोरसे, मनोज दुसाने यांच्यासह स्थानिक गुन्हे शाखा जळगावचे संदीप पाटील, प्रवीण मांडवी, दीपक शिंदे, चोपडा ग्रामीण पोस्टेचे हवालदार शिंगणे, सुनील जाधव, राकेश पाटील यांनी केली आहे.