तीनशे वर्षांपूर्वीचे मंदिर;नवस फेडण्यासाठी होते भाविकांची गर्दी
Dhanora News-जळगाव लाईव्ह न्यूज । अमोल महाजन । चोपडा तालुक्यातील धानोरा येथे तीनशे वर्षांपासून सतपंथ ज्योत मंदिराची स्थापना करण्यात आली असून याठिकाणी गेल्या ३७ वर्षांपासून शुद्ध गायीच्या तुपाची अखंड ज्योत तेवत आहे. सोमवारी (ता.२६) या अखंड ज्योतीचा ३७ वा वर्धापनदिन असून यानिमित्ताने मंदिरात सकाळपासूनच पूजा पाठ व नवस फेडण्यासाठी भाविक भक्तांची मोठी गर्दी होत असते.
धानोरा येथील सतपंथ मंदिरात दरवर्षी घटस्थापनेच्या दिवशी अखंड ज्योतीचा वर्धापनदिन मोठ्या भक्तिभावाने साजरा केला जातो. यानिमित्त सर्व मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई व फुलांनी सजविण्यात येते. सकाळी सहा वाजता अथर्ववेद प्रमाणे सतपंथ घटपाट पूजाविधी करण्यात येतो. याप्रसंगी भाविकांची मोठी गर्दी होते. पूजेनंतर मंदिरावर सफेद रंगाचा ध्वज चढवला जात असतो.
३७ वर्षांपासून अखंड ज्योत
धानोरा येथील सतपंथ मंदिर तीनशे वर्षांपासून स्थापन करण्यात आले असून मागील गेल्या ३७ वर्षांपासून याठिकाणी शुद्ध गायीच्या तुपाची अखंड ज्योत रात्रंदिवस सुरूच असते. यासाठी दररोज या दिव्यात अर्धा किलो तूप लागते.
गुढीपाडव्याला मोठा उत्सव
चैत्र महिन्यात गुढीपडव्याला मंदिराचा ध्वज चढविला जातो. यादिवशी भाविक भक्त नवस फेडण्यासाठी येत असतात.
यानिमित्ताने मंदिराच्या वतीने धर्मपीठ प्रेरणा पीठ पिराणा (अहमदाबाद गुजरात) येथे पदयात्रा काढली जाते यात भाविक मोठ्या संख्येने सहभागी होऊन सहाशे किलोमीटर चे अंतर १५ दिवसात पार करतात.
वर्षभर चालतात धार्मिक कार्यक्रम
सतपंथ ज्योत मंदिरात वर्षभर विविध प्रकारचे धार्मिक विधी पार पाडले जातात यात प्रामुख्याने दैनंदिन पूजापाठ, गुरुवारी महापूजा, मृत्यू नंतर मोक्ष प्राप्तीसाठी उटासन, देवीचे पाठ, होम हवन,दररोज सायंकाळी महाआरती केली जाते.
संतांचे मोलाचे मार्गदर्शन
हिंदू धर्मात सतपंथ हा एक पंथ असून यात कलियुगातील अथर्ववेद वर आधारित पूजा विधी केली जाते. यासाठी सतपंथाचे जगद्गुरू श्री ज्ञानेश्वरदास महाराज (गुजरात) व महामंडलेश्वर जनार्दन हरीजी महाराज (फैजपूर) यांच्या मार्गदर्शनात विविध प्रकारचे धार्मिक सोहळे पार पडतात.