⁠ 
रविवार, नोव्हेंबर 10, 2024
Home | जळगाव जिल्हा | जळगाव शहरात शिंदेंपेक्षा ठाकरे गटाची ताकद जास्त, मात्र…!

जळगाव शहरात शिंदेंपेक्षा ठाकरे गटाची ताकद जास्त, मात्र…!

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । चिन्मय जगताप । महाराष्ट्राच्या राजकारणातलं सर्वात मोठं राजकीय बंड होऊन एक वर्ष पूर्ण होत आहे. यातच गेल्या वर्षभरात राजकीय वर्तुळात प्रचंड उलथापालथ झाल्याचे निदर्शनास येत आहे. जळगाव शहराविशयी म्हणायला गेलो तर गेल्या एका वर्षात सत्ता असूनही शिंदे गटाला आपला दबदबा निर्माण करता आला नसल्याचे पाहायला मिळत आहे.

शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण हे चिन्ह हे एकनाथ शिंदे यांच्या गटाकडे गेल्याने सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे मशाल चिन्ह व उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष आहे. जळगाव शहरामध्ये उद्धव बाळासाहेब ठाकरे हा पक्ष शिवसेना या पक्षापेक्षा वरचढ असल्याचे पाहायला मिळत आहे. याचे कारण म्हणजे कार्यकर्त्यांची असलेली संख्या ही उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे जास्त प्रमाणात दिसून येत आहे.(shivsena jalgaon)

उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे महानगर प्रमुख शरद तायडे असून शिवसेना पक्षाचे दोन महानगर प्रमुख आहेत. गणेश सोनवणे व कुंदन काळे अशी त्यांची नावे आहेत. महानगरपालिकेमध्ये असलेली नगरसेवकांची संख्या ही शिवसेने कडे जास्त आहे. मात्र शिवसेनेच्या निशाणीवर निवडून आलेल्या 15 नगरसेवकांपैकी 13 नगरसेवक हे अजूनही उद्धव ठाकरे यांच्या सोबतच आहेत. य़ाच बरोबर महापौरपद , उप महापौरपद व विरोधी पक्ष नेतेपद हे ठाकरे गटाकडे आहे. तर भारतीय जनता पक्षाकडून बंडखोरी करून शिवसेनेत आलेले तब्बल २० ते २२ नगरसेवक हे आता शिवसेनेत आहेत. अशावेळी सुरुवातीपासून शिवसेनेत असलेल्या नगरसेवकांची संख्या ही ठाकरेंसोबत आहे. तर आयारामांची संख्या ही शिंदें सोबत असल्याचे पाहायला मिळत आहे.(jalgaon shinde and thakre)

शिवसेनेकडे सध्या शहरामध्ये 75 शाखा असल्याचा दावा शहर प्रमुख गणेश सोनवणे यांनी केला आहे. यातील 25 शाखा या जुन्या असून पन्नास शाखा या नवीन बनवल्या असल्याचे त्यांनी सांगितले. तर दुसरीकडे ठाकरेंच्या शिवसेनेकडे 83 शाखा आहेत. अशावेळी ठाकरेंची शिवसेना ही शाखांच्या बाबतीत शिंदेंपेक्षा अधिक मजबूत असल्याचे पाहायला मिळत आहे. ‘युवासेना’ जो शिवसेनेचा महत्त्वपूर्ण अंग आहे. यामध्ये शिंदे गटाकडे ठाकरे गटाच्या तुलनेत अतिशय कमी संख्याबळ आहे.

शिवसेना हा पक्ष रस्त्यावरच्या आंदोलनामुळेच ओळखला जातो. अशावेळी ठाकरे गट करत असलेली आंदोलन ही शिंदे गटाच्या आंदोलनाहून जास्त मोठ्या पद्धतीने होत असल्याचे प्रकर्षाने जाणवते. अशा वेळी रस्त्यावर ठाकरे गट हा मोठा असल्याचे पाहायला मिळत आहे.

या सगळ्या गोष्टींची जर तुलना केली तर ठाकरे गट हा नक्कीच शिंदे गटाहून मोठा गट म्हणुन पहायला मिळू शकतो. वर्षभरात जरी ठाकरे गटाने आपला जम बसवला असला तरी ठाकरे गटामध्ये असलेला अंतर्गत कलह येत्या काळात शिंदे गटाला आपोआप मदत करेल असेही पाहायला मिळत आहे.

स्वतःला आपण निष्ठावान आहोत असे म्हणत कित्येक शिवसैनिक अजूनही ठाकरेंसोबत आहेत. मात्र त्यांची नाराजी ही सध्या सुरू असलेल्या संघटनात्मक वाटचालीवर आहे. अशावेळी याचा फायदा आणि निवडणुकीमध्ये शिंदे गट घेऊ शकतो व ठाकरे गटाला मोठा धक्का देऊ शकतो. असेही म्हटले जात असून येत्या काळात याचीही शक्यता नाकारता येत नाही.

जळगाव शहराचे माजी आमदार सुरेशदादा जैन हे सध्या ठाकरेंसोबत आहेत. मात्र ते पक्ष बदलतील अशाही चर्चा सध्या राजकीय वर्तुळात रंगू लागल्या आहेत. याबाबत काहीही स्पष्ट नसले तरी जर तर चा विचार केला तर येत्या काळात जर सुरेश जैन यांनी आपला पक्ष बदलायचा प्रयत्न केला किंवा ईतर पक्षात गेले तर याचा मोठा फटका हा ठाकरेंच्या शिवसेनेला बसेल हे मात्र नक्की.

सरते शेवटी ठाकरे गट या क्षणाला जरी शिंदे गटापेक्षा वरचढ दिसला तरी येत्या वर्षात होणाऱ्या राजकीय बदलांमुळे नक्की काय होते हे पाहणं अतिशय उत्सुकतेच ठरणार आहे.

author avatar
टीम जळगाव लाईव्ह