गुरूवार, जून 8, 2023

गुलाबरावांच्या सभेत एकाने दिल्या ’50 खोके एकदम ओके’च्या घोषणा !

जळगाव लाईव्ह न्यूज : ७ एप्रिल २०२३ : महाराष्ट्रात अभूतपूर्व सत्ता परिवर्तन झाल्यानंतर संपूर्ण राज्यात ’50 खोके एकदम ओके’ ही म्हण अगदी रुजली आहे. खास करून शिंदे गटाचे आमदार समोर आले की ’50 खोके एकदम ओके’ अशा प्रकारच्या घोषणा दिल्या जातात. जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेमध्ये देखील अशीच घोषणा देण्यात आली असल्याची घटना नुकतीच घडली असल्याच्या चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहेत.

शिरसोली येथे मंत्री गुलाबराव पाटील यांची सभा झाली. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांच्या सभेसाठी नागरिक नेहमीच उत्सुक असतात. त्यांच्या सभेची शैली ही वेगळीच आहे. गुलाबराव पाटील यांची सभा बघण्यासाठी लोक येतात ही वस्तुस्थिती आहे. अशावेळी शिरसोली येथे सभेला चांगलीच गर्दी झाल्याचे पाहायला मिळाले होते.

मात्र गर्दी मधल्या एका माणसाने ‘पन्नास खोके एकदम ओके’ अशी हाक दिली. त्यांनी दिलेल्या घोषणामुळे गुलाबराव पाटील यांनी आपले भाषण मध्येच थांबवले. त्या व्यक्तीला सभा केंद्रावरून हटवण्यात आले. नंतर पुन्हा गुलाबराव पाटील यांनी आपली सभा सुरू केली. अशी चर्चा सध्या राजकीय वर्तुळात सुरू आहे.