दुचाकी अपघात : कुर्‍हाकाकोडा गावातील तरुणाचा दुर्दैवी मृत्यू

जळगाव लाईव्ह न्यूज । ७ नोव्हेंबर २०२२ । कुर्‍हाकाकोडा गावातील तरुणाचा दुचाकी अपघातात मृत्यू झाला आहे.. मुलगा होतकरू असल्याने आपले दिवस पालटतील, अशी आस लावून बसलेल्या आई बापाचे स्वप्न गजाननच्या अकाली जाण्याने धुळीस मिळाले आहे. गजानन विनोद कांडेलकर (18) असे मयत तरुणाचे नाव आहे. गजानन हा तरुण 5 रोजी रात्रीच्या वेळी आपला सोबती दिनेश प्रकाश खिरळकर याच्या सोबत मोटारसायकलने घरी परत येत असताना विटाळी, धानोरा, जि.बुलढाणा येथे त्याचा अपघात झाला. त्या दोघांना तत्काळ मलकापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले मात्र प्रकृती अधिक खालावल्याने त्यास पुढील उपचारासाठी जळगावकडे जात असताना त्यांना मुक्ताईनगर येथे शासकीय रुग्णालयात दाखल केले. वैद्यकीय अधिकार्‍यांनी तपासणी करून गजानन यास मृत घोषित केले तर त्याचा सोबती दिनेश खिरळकर (25) याला गोदावरी हॉस्पिटल मध्ये मध्यरात्री भरती करण्यात आले असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत.

रांगडा तितकाच प्रेमळ
लहान वयापासून गजानन हा मेहनती असल्यामुळे हाताला मिळेल ते काम तो आनंदाने करत होता. दोन-तीन माणसांचे काम एकटा करण्याची धमक असल्याने ऐन तारुण्यात त्याच्या शरीराने आकार घेतला होता. दिसायला रांगडा असला तरी खूप प्रेमळ स्वभावाचा असलेला गजानन मोठ्यांचा आदर ठेवण्यात पुढे असायचा. त्याच्या अकस्मात जाण्याची बातमी गावात धडकली आणि लहान मोठ्यांनी त्याच्या घराकडे धाव घेतली. कुटुंबावर तर आभाळच कोसळले. साश्रू नयनांनी त्याच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले.