पंधरा दिवसात वेगवेगळ्या घटनांमध्ये १० लाखांचा ऐवज लांबवला
जळगाव लाईव्ह न्यूज । १६ नोव्हेंबर २०२१ । चाळीसगाव शहर आणि परिसरात गेल्या पंधरवड्यात चोरट्यांचा मोठा सुळसुळाट झाला आहे. पंधरा दिवसात वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी तब्बल दहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे.
सविस्तर असे की, दिवाळीपासून शहरात वेगवेगळ्या घटनेत १० लाखांचा ऐवज चाेरीला गेला आहे. ३१ ऑक्टोबरला रात्री शहरातील भाजी मंडई रस्त्यावरील एका कपड्याच्या दुकानातून अज्ञात चोरट्याने १ लाखाची रक्कम चोरून नेली हाेती. तर त्याच दिवशी सायंकाळी स्टेशन रोडवरील पालिका कॉम्प्लेक्समध्ये कपडे खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधील दोन ताेळे सुमारे १ लाख ३८ हजारांचे सोन्याचे दागिने चोरट्याने लंपास केले होते.
त्यानंतर ७ रोजी शहरातील छायादिग्राम भागात डॉक्टरचे घर फोडून चोरट्यांनी साडे तीन लाखांचा ऐवज लांबवला हाेता. तर दुसऱ्या घटनेत दोन भामट्यांनी घाट रोड पुलावरून पायी जाणाऱ्या महिलेच्या गळ्यातील २१ ग्रॅमची सोन्याची पोत हिसकावली हाेती. असे एकूण पंधरा दिवसात वेगवेगळ्या घटनेत चोरट्यांनी तब्बल दहा लाखांचा ऐवज लंपास केला आहे.