शेतकऱ्यांना दिलासा ! केळीच्या दरात सुधारणा… आता क्विंटलमागे ‘इतक्या’ रुपयांची वाढ?

सप्टेंबर 12, 2025 11:49 AM

जळगाव लाईव्ह न्यूज । १२ सप्टेंबर २०२५ । व्यापाऱ्यांच्या मनमानीने गत महिनाभरापासून केळीचे भाव पाडले जात असल्याचा आरोप केळी उत्पादक शेतकऱ्यांकडून केला जात होता. केळी दरात मोठी घसरण झाल्यानं शेतकऱ्यांना मोठं आर्थिक नुकसान सोसावे लागले. मात्र आता उत्तर भारतातील पूर परिस्थिती नियंत्रणात आल्याने आणि नवरात्रोत्सवाचे वेध लागल्यानंतर केळीच्या दरात आता क्विंटलमागे ४०० रूपयांनी वाढ झाल्याचे दिसून आले आहे. यामुळे उत्पादकांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

banana

बऱ्हाणपूरच्या केळी लिलाव बाजारातील बनवाबनवी काही दिवसांपूर्वीच सर्वांसमोर आली होती. १२ ऑगस्टपर्यंत केळीला प्रतिक्विंटल १८२५ रुपयांचा दर मिळत होता. मात्र, त्यानंतर अचानक व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन भाव पाडण्यास सुरूवात केली. काही दिवसापूर्वी अवघा ५०० ते ६०० प्रति क्विंटल दर मिळत होता. केळीचे भाव कृत्रिमरित्या पाडण्यात येत असल्याने शेतकरी संतप्त झाले होते.

अशा या परिस्थितीत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी जळगावचे जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी बऱ्हाणपूर जिल्हाधिकारी हर्ष सिंह यांच्याशी व्हिडिओ कॉन्फरन्सवर तातडीची बैठक घेतली होती. अखेरच्या २० किमान सौद्यातील बाजारभावांची सरासरी काढून किमान भाव घोषित करण्याचा व केळी बाजारातील अवैध व्यापाऱ्यांची सातत्याने तपासणी करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याच्या उपाययोजनांवर शिक्कामोर्तब करण्यात आला होता.

दरम्यान, केळीचे दर घसरण्यास कारणीभूत ठरलेल्या काही कारणांपैकी एक असलेले पावसाळी वातावरण आता बऱ्यापैकी निवळले आहे. वाहतूक व्यवस्था सुरळीत होऊन उत्तर भारतात केळी पाठविण्याची प्रक्रिया देखील सुलभ झाली आहे. दुसरीकडे, नवरात्रोत्सव दहा दिवसांवर आल्यामुळे केळीच्या मागणीत अचानक वाढ झाली आहे. यामुळे आठ दिवसांपूर्वी ११५१ रूपयांपर्यंत खाली आलेले केळीचे दर गुरूवारी १६३६ रूपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले. या कारणाने मोठ्या दर प्रमाणात घसरल्याने काही दिवसांपासून आर्थिक नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्यांना काहीअंशी दिलासा मिळाल्याचे चित्र आहे.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now