⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

केळी पीक विम्याबाबत जिल्हाधिकाऱ्यांची महत्वाची माहिती

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ फेब्रुवारी २०२४ । हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील १० हजार ६१९ शेतकऱ्यांच्या पीक पॉलिसी रद्द करून नाकारण्यात आल्या होत्या. त्यावर सोमवारी तोडगा काढून ६ हजार ६८६ शेतकऱ्यांच्या प्रकरणांना मंजुरी दिल्याची माहिती जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी दिली.

कृषी विभागाला १० हजार ६१९ नामंजूर प्रकरणाची फेरतपासणी करून अपील पात्र झालेल्या प्रस्तावावर कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या. त्यात आता ६ हजार ६८६ प्रकरणांना मंजूर दिली आहे. हवामानावर आधारित फळपीक विमा योजनेत सहभागी असलेल्या जिल्ह्यातील १०,६१९ शेतकऱ्यांच्या पीक पॉलिसी रद्द करून नाकारण्यात आल्या होत्या.

त्यावर तोडगा काढण्यासाठी गेल्या तीन महिन्यांत दोन वेळा जिल्हाधिकारी कार्यालयावर ठिय्या आंदोलन झाले होते. २ फेब्रुवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर शिंगाडे मोर्चा काढण्यात आला होता. त्यावेळी पीक विमा प्रस्ताव नाकारलेल्या शेतकऱ्यांच्या विषयावर १४ फेब्रुवारी बैठक घेऊन तोडगा काढला जाईल, असे लेखी पत्र दिल्यावर ते आंदोलन तात्पुरते स्थगित करण्यात आले होते.

प्रस्तावांमधील बहुतांश केळी पिकाचे क्षेत्र हे चोपडा, यावल, रावेर, जळगाव व मुक्ताईनगर या तालुक्यातील होते. रावेर, यावल, मुक्ताईनगर, जळगाव व चोपडा या तालुक्यात ७९७१ इतक्या शेतकऱ्यांचे पीक विमा प्रस्ताव दाखल करण्यात आले होते.

त्यापैकी ५२३५ शेतकऱ्यांनी तालुकास्तरीय समितीकडे अपील दाखल करण्यात आलेले होते. त्यापैकी ३८५६ अपील पात्र असून १३७९ अपील अपात्र करण्यात आलेले आहे. पालकमंत्री गुलाबराव पाटील यांनी या प्रकरणी लक्ष घालून जिल्हा प्रशासनाला याबाबत पात्र शेतकऱ्यांच्या हक्काची विमा रक्कम मिळावी, यासाठी कार्यवाही करण्याच्या सूचना दिल्या होत्या. त्यावर सोमवारी (ता.२६) निर्णय घेत ६ हजार ६८६ शेतकऱ्यांच्या प्रकरणांना मंजुरी दिली आहे.