⁠ 
बुधवार, एप्रिल 24, 2024

महाराष्ट्रात पुन्हा मास्क सक्तीबाबत आरोग्यमंत्र्यांनी दिली महत्त्वाची माहिती

जळगाव लाईव्ह न्यूज । २७ एप्रिल २०२२ । देशासह महाराष्ट्रात कोरोना रुग्णांची संख्या वाढताना दिसतेय. याच पार्श्वभूमीवर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत महत्त्वपूर्ण बैठक घेतली. त्यात आरोग्यमंत्रीही सहभागी झाले होते. या बैठकीनंतर राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी प्रसारमाध्यमांना माहिती दिली आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपण आज संध्याकाळी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांसोबत चर्चा करणार असल्याचं पंतप्रधानांसोबत झालेल्या बैठकीत स्पष्ट केलं आहे, असं राजेश टोपे यांनी सांगितलं. तसंच मुख्यमंत्र्यांच्या या बैठकीनंतर राज्यात गर्दीच्या ठिकाणी पुन्हा मास्कसक्ती होण्याची शक्यता आहे, असा अंदाजही टोपे यांनी व्यक्त केला आहे.

पंतप्रधान मोदी यांच्यासोबत झालेल्या आढावा बैठकीनंतर राजेश टोपे यांनी महाराष्ट्रात कोरोना प्रादुर्भाव रोखण्यासाठी कोणत्या उपाययोजना केल्या जातील, याबाबत माहिती दिली आहे. ‘ आज आपण दररोज 25 हजारापर्यंत कोविड टेस्ट करत आहोत. हे टेस्टिंग आणखी वाढवण्यात येईल. महाराष्ट्र सेफ झोनमध्ये आहे, चिंता करण्याचं कुठलंही कारण नाहीये. राज्यात सक्रीय रुग्णांची संख्या 929 इतकी आहे. राज्याने एका-एका दिवशी 65 हजार रुग्णसंख्या पाहिली आहे. एकंदरीत आकडेवारी पाहिली तर इतर राज्यांच्या तुलनेत कमी आहे. दर 10 लाख नागरिकांमागे किती रुग्ण आहेत तर राज्यात 7 रुग्ण आहेत. त्यामुळे काळजी करण्याची गरज नाही, असेही ते म्हणाले.

महत्वाची बाब म्हणजे गर्दीच्या ठिकाणी मास्क बंधनकारक केला जाऊ शकतो. संध्याकाळी मुख्यमंत्री सर्व जिल्हाधिकाऱ्यांची बैठक घेणार आहेत. त्यानंतर मास्कबाबतचा निर्णय होईल, अशी माहिती टोपे यांनी दिलीय. दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी मास्क न वापरणाऱ्यांना 500 रुपये दंड आकारणीला सुरुवात केलीय. आपण सक्ती जरी करत नसलो तरी त्याबाबत आग्रही राहण्याची शक्यता आहे. इमर्जन्सी कोविड रिस्पॉन्सीबिलिटी प्रोगॅममध्ये लागणाऱ्या खर्चात महाराष्ट्र देशाच्या सरकारीच्या तुलनेत नक्कीच पुढे आहे, असंही त्यांनी सांगितलं. त्याचबरोबर सर्व रुग्णालयांचे फायर ऑडिट करण्याबाबत चर्चा झाली. कोविडबाबतची सगळी यंत्रणा तयार राहावी याबाबत निर्देश देण्यात येतील, असंही टोपे म्हणाले.