⁠ 
सोमवार, मे 6, 2024

नुकसानग्रस्त शेतकर्‍यांना तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करण्याची स्वाभिमानी शेतकरी संघटनेची मागणी

जळगाव लाईव्ह न्यूज| ११ ऑगस्ट २०२३। मुक्ताईनगर तालुक्यातील कुर्‍हा काकोडा, वडोदा,सुडे, चिंचखेडा हा परिसर अतिवृष्टीने, पुराने बाधित झालेला असून मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्या आदेशानुसार तात्काळ सानुग्रह अनुदान हजार दहा तात्काळ मिळावे, असे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे निवेदनाद्वारे मागणी केली आहे.

कुर्‍हा वडोदा, सुडे चिंचखेडा परिसरात अतिवृष्टी पुरामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांची पडझड झालेली असून घरात चिखल साचलेला आहे नागरिकांचे कपडे भांडे धान्य पुरात वाहून गेली. शेतकर्‍यांचे शेती पिकांचे शंभर टक्के नुकसान झालेले आहे. विहरी खचल्या असून शेती पिकं पूर्ण वाहून गेलेली आहे. बर्‍याच शेतकर्‍यांचे पशुधन वाहून गेले असून शेतामध्ये मोठ मोठे नाले तयार झाले आहेत.

दरम्यान, २० दिवस उलटूनही अद्यापही शासनाने जाहीर केलेले तात्काळ मिळणारे सानुग्रह अनुदान दहा हजार रुपये अद्याप पर्यंत शेतकर्‍यांना मिळाले नाही. अशा या निसर्गाच्या कोपात बर्‍याच शेतकर्‍यांनी विमा कंपन्यांकडे शेती नुकसानीची तक्रार ७२ तासांच्या आत केली नाही.

त्यामुळे विमा कंपन्या त्यांचे नुकसानीचे पंचनामे करण्यास नकार दिला आहे अशा या नैसर्गिक आपत्तीत सापडलेल्या सर्व शेतकर्‍यांचे विमा कंपन्यांकडून सरसकट पंचनामे करण्याचे आदेशित करण्यात येऊन बाधित शेतकर्‍यांना तात्काळ सानुग्रह अनुदान वाटप करण्यात यावे अशी मागणी स्वाभिमानीचे जिल्हाध्यक्ष डॉ. विवेक सोनवणे यांनी जिल्हाधिकार्‍यांना दिलेल्या निवेदनाद्वारे केली आहे.