⁠ 
शुक्रवार, मार्च 29, 2024

शेतकऱ्यांसाठी चिंताजनक बातमी ! पुढच्या दोन दिवसात राज्यातील ‘या’ जिल्ह्यांमध्ये पावसाचा इशारा

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ नोव्हेंबर २०२२ । गेल्या महिन्यात राज्यात पावसाने उसंती घेतल्याने शेतकऱ्यांसह सर्वांनाच दिलासा मिळाला होता. मात्र आता ऐन थंडीत हवामान खात्याकडून पावसाचा इशारा देण्यात आला आहे. 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता वर्तविण्यात आलेली आहे.

या कारणामुळे महाराष्ट्रात पावसाची शक्यता
मागच्या काही दोन दिवसापूर्वी बंगालच्या उपसागरातील वायव्य भागापासून श्रीलंकेच्या किनारपट्टीपर्यंत कमी दाबाचा पट्ट्याची स्थिती तयार झाली आहे. याचबरोबर पुढच्या 24 तासांत कमी दाबाच्या पट्ट्याची क्षमता वाढण्याची शक्यता आहे. उद्या (दि.12) नोव्हेंबरला हा कमी दाबाचा पट्टा तमिळनाडू-पुद्दुचेरी किनारपट्टीवर धडकणार आहे. यामुळे दक्षिण भारतात पाऊस वाढणार आहे. या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे राज्यातील कोकण, मध्य महाराष्ट्रातील कोल्हापूर, साताऱ्यासह पुण्यातील काही भागात पाऊस पडण्याची शक्यता आहे. मराठवाडा आणि विदर्भ या भागांत हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे.

राज्यात यंदा जून महिन्यात दडी मारलेल्या पावसाने चक्क तीन महिने धुमाकूळ घातला होता. यादरम्यान झालेल्या पावसामुळे राज्यातील अनेक भागात जनजीवन विस्कळीत झालेलं पाहायला मिळाले होते. दरम्यान, गेल्या काही दिवसापासून राज्यात पावसाने उसंती घेतल्यानंतर या नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून तापमानात झपाट्याने घट होऊन थंडीची चाहूल लागली होती.

मात्र मागील काही दिवसापासून राज्यातील वातावरणात बदल होत आहे. राज्यात दिवसा ढगाळ वातावरण राहिल्यामुळे कमाल तापमानात वाढ होत आहे, तर रात्रीच्या वेळी किमान तापमानात वाढ होत आहे. मात्र, 13 आणि 14 नोंव्हेबरला मध्य महाराष्ट्र आणि कोकणच्या काही भागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे.