⁠ 
शनिवार, मे 4, 2024

राज्यात 15 सप्टेंबरपर्यंत चांगल्या पावसाचा अंदाज ; जळगावात कशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ५ सप्टेंबर २०२३ । गेल्या काही दिवसापासून राज्यासह जळगाव जिल्ह्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाअभावी पिकांनी माना टाकल्या असल्याचे चित्र आहे. पाऊस कधी परतेल याकडे सर्वांच्या नजर ढगांकडे लागल्या आहेत.

अशातच बंगालच्या उपसागरातल्या कमी दाबाच्या पट्ट्याने मान्सून परतणार असल्याचे हवामान विभागाकडून सांगण्यात आले आहे. गेल्या एक दोन दिवसापासून राज्यातील काही ठिकाणी पावसाने हजेरी लावली. यामुळे पिकांना आधार मिळाला आहे. दरम्यान, आज मंगळवार, 5 सप्टेंबरपासून पुढील 10 दिवस म्हणजे 15 सप्टेंबरपर्यंत राज्यात चांगल्या पावसाचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे.

पश्चिम, उत्तर महाराष्ट्र आणि मराठवाड्यामध्ये मध्यम ते मुसळधार तर मुंबईसह कोकण व विदर्भात जोरदार ते अति जोरदार पावसाची शक्यता असल्याचे हवामानतज्ज्ञ यांनी सांगितले आहे. दरम्यान, आगामी दोन दिवसात जळगाव जिल्ह्यात देखील मध्यम पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे.

तापमान घसरले
गेल्या चार पाच दिवसांपासून जळगावातील तापमानात सतत वाढ होत असल्याचे समोर आले. परीणामी उकाडाही मोठ्या प्रमाणात वाढता होता. रविवारी पारा ३६ अंशांवर होता. त्यात सोमवारी दोन अंशांनी घसरण झाली. दुपारनंतर आकाशात काही अंशी पावसाळी ढग दिसून आले. मात्र, ते अपेक्षित असतानाही बरसले नाहीत. परंतु, असे असले आगामी दोन दिवसांत तापमानात घसरण होऊ शकते. तसेच या दोन दिवसांत मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. यामुळे पिकाना आधार मिळू शकतो.

जळगाव २१ टक्के कमी पाऊस
यंदा मान्सून उशिरा दाखल झाला. त्यातही पावसाने जून महिन्यात ओढ दिल्यानंतर जुलै महिन्यात चांगली हजेरी लावली. मात्र ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने विश्रांती घेतली आहे. पावसाळ्याच्या तीन महिन्यात २१ टक्के कमी पाऊस झाला आहे. पावसाअभावी जिल्ह्यातील अनेक धरणे खाली झाले असून आता आगामी दिवसात पाऊस न झाल्याने पाणीटंचाईची शक्यता नाकारता येणार नाही.