राज्यासाठी पुढील तीन दिवस महत्वाचे ; जळगाव जिल्ह्यात पावसाची अशी राहणार स्थिती?

जळगाव लाईव्ह न्यूज । ८ सप्टेंबर २०२३ । महिनाभराच्या प्रदीर्घ विश्रांतीनंतर राज्यात पुन्हा एकदा पावसाने जोरदार पुनरागमन केलंय. गेल्या दोन दिवसापासून जळगाव जिल्ह्यासह राज्यातील विविध भागात पाऊस सुरु आहे. पावसामुळे खरीप हंगामातील पिकांना मोठा दिलासा मिळाला असून बळीराजा सुखावला आहे. राज्यात येत्या दोन ते तीन दिवसात पावसाचा आणखीच जोर वाढणार असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. जळगाव जिल्ह्यात देखील पुढील तीन दिवस मुसळधारचे संकेत आहेत.

राज्यात १७ सप्टेंबरपर्यंत पावसाचा जोर कायम राहणार असून पुढील दोन दिवस अजून राज्यात सर्वत्र पाऊस आहे. त्यानंतर पावसाचा जोर कमी होणार असून पुन्हा १४ सप्टेंबरनंतर पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. या पावसाचा फायदा रब्बी हंगामाला होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात गेल्या दोन दिवसापासून पाऊस होत असून यामुळे शेतकऱ्यांच्या जीवात जीव आला आहे. ऑगस्टच्या पहिल्याच आठवड्यापासून पाऊस सुट्टीवर गेला होता. पावसाअभावी खरिपाची पिके धोक्यात आली होती. यामुळे शेतकरी चिंतेत आला होता. पाऊस कधी परतेल याची प्रतीक्षा करीत होता. मात्र अशात बंगालच्या उपसागरात कमी दबाचा पट्टा तयार झाल्यामुळे राज्यात पावसाने जोरदार पुनरागमन केलंय.

जळगावसह राज्यात पावसाची संततधार सुरु आहे. काही ठिकाणी जोरदार पाऊस झाल्याने नदी नाल्यांना पूर आला. जळगाव जिल्ह्यात आगामी तीन दिवस मुसळधार पावसाचे संकेत आहे. यामुळे महिन्याभरापासून असलेली चिंता आता मिटली आहे. पावसाचा जोर अजून काही दिवस राहणार आहे.