⁠ 
गुरूवार, जुलै 25, 2024

जळगावात वाळू माफियांची दादागिरी ; मंडळ अधिकाऱ्याला ओढून जप्त केलेलं ट्रॅक्टर पळविले..

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १८ मार्च २०२४ । जळगाव जिल्ह्यात अवैध वाळू माफियांनी धुमाकूळ घातला असून कारवाई करूनही चोरी छुपे अवैध वाळू वाहतूक जोऱ्यात सुरु आहे. यात कारवाईसाठी जाणाऱ्या अधिकाऱ्यांवर होणारे हल्लेही अलीकडच्या काळात वाढले आहे. आता याच दरम्यान अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई करत जप्त केलेले वाळूचे ट्रॅक्टर घेऊन जात असताना मंडळ अधिकाऱ्यास ट्रॅक्टरवरून खाली ओढून तीन जणांनी ट्रॅक्टर पळवून नेल्याची घटना रामानंदनगर घाटानजीक घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल झाला.

अवैध वाळू वाहतुकीविरुद्ध कारवाई प्रांताधिकाऱ्यांनी करण्यासाठी पथक नेमून कारवाईचे आदेश दिले होते. त्यानुसार शनिवार, १६ मार्च रोजी मंडळ अधिकारी रमेश वंजारी, तलाठी मनोहर बाविस्कर, ज्ञानेश्वर माळी, विरेंद्र पालवे हे गस्त घालत असताना वाघनगर थांब्याजवळ त्यांना लाल रंगाचे विना क्रमांकाचे एक ट्रॅक्टर वाळू वाहतूक करताना आढळले. ट्रॅक्टर चालक गजाराम बारेला (रा. हरिविठ्ठल नगर) याला वाळू वाहतूक परवान्यासंदर्भात विचारले असता, त्याच्याकडे परवाना नव्हता.

पुढील कारवाईसाठी जप्त केलेले ट्रॅक्टर जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात नेण्यासाठी मंडळ अधिकारी वंजारी हे ट्रॅक्टरमध्ये बसले व इतर कर्मचारी दुचाकीवर जात असताना रामानंदनगर घाटाच्या पायथ्याशी ट्रॅक्टर मालक अमर सोनवणे व जितेंद्र सोनवणे (दोन्ही रा. समतानगर) आले व त्यांनी ट्रॅक्टर थांबवून महसूल पथकाशी अरेरावीची भाषा व दादागिरी करीत मंडळ अधिकाऱ्यांना ट्रॅक्टरवरून खाली ओढले. ‘तुम्हाला जेथे जायचे तेथे जा, आम्ही ट्रॅक्टर नेऊ देणार नाही’ अशी धमकी देत वाळूने भरलेले ट्रॅक्टर पळवून घेऊन गेले. या पथकाने वरिष्ठांना माहिती दिली.

बाविस्कर यांनी रामानंद नगर पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावरून चालक गजाराम बारेला याच्यासह अमर सोनवणे व जितेंद्र सोनवणे यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोउनि प्रदीप बोरुडे करीत आहेत.