⁠ 
सोमवार, एप्रिल 22, 2024

जिल्ह्यातील अवैध धंद्यांना लागणार टाळा; शहरात लवकरच ‘वॉश आउट’ मोहीम

जळगाव लाईव्ह न्यूज| १० ऑगस्ट २०२३। शहर व तालुक्यात अवैध धंद्यांना ऊत आला असून, संरक्षण देण्याचे काम यंत्रणेकडून केले जात असल्याने सर्वसामान्य नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांच्या कार्यकाळात ‘एमपीडीए’च्या कारवायांमध्ये वाढ झाली असून, गुन्हेगारी आटोक्यात आणण्याचे सर्वोतोपरी प्रयत्न केले जात आहेत.

मात्र मागील काळातील दंगलींच्या घटनांमध्ये शहर होरपळून निघाले आहे. त्यामुळे अंतर्गत धुसफूस वाढून शहर अस्वस्थतेच्या उंबरठ्यावर येऊन ठेपले आहे. त्यामुळे भविष्यात मोठी दंगल अथवा गुन्हेगारी रोखायची असेल तर अवैधधंद्यांना रोखणे गरजेचे झाले असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. अमळनेर शहर संत सखाराम महाराजांची पुण्यभूमी आणि पुज्य साने गुरुजी यांची कर्मभूमी म्हणून ओळखले जाते. शांत आणि संयमी शहर म्हणून अमळनेरची ओळख आहे. मात्र सध्या शहर व तालुक्यात काही प्रमाणात सट्टा, पत्ता, जुगार, झन्नामन्ना, सोरट, अवैध दारू आदी अवैध धंदे सुरू आहेत.

येणाऱ्या काळात १५ ऑगस्ट, गणपती, नवरात्र, दसरा आणि दिवाळी हे सण उत्सव लागोपाठ येणार आहेत. या सणामध्ये महिला व मुली मोठ्या संख्येने खरेदीसाठी आणि गणपती आरास नवरात्र उत्सवातील दांडियात सहभागी होण्यासाठी रात्री बाहेर पडतात. त्यामुळे शहरात सुरू असलेल्या अवैध धंद्यामुळे महिला व मुलींची छेड काढण्याचे प्रकार वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही म्हणून या अवैधधंद्यांना आत्ताच रोखले नाही तर आगामी सण उत्सव धोक्यात येऊन शहराची कायदा आणि सुव्यवस्था बिघडण्याचा धोका वाढू शकतो. पोलिस निरीक्षक विजय शिंदे यांनी अवैध धंद्यांवर कारवाई सुरू केली असली तरी त्यात सातत्य ठेवण्याची गरज आहे.

पोलिसांची पाठ फिरली की अवैध धंदे पुन्हा सुरू होत असल्याचा सूर नागरिकांमधून उमटत आहे. शहरातील गुन्हेगारीवर आणि अवैधधंद्यांवर नियंत्रण ठेवण्यासाठी शहर पोलिस ठाणे अंतर्गत डीबी पथकाची नियुक्ती केली जाते. मात्र पथक निष्क्रिय झाले आहे की काय? अशी शंका निर्माण झाली आहे.

“शहरात अवैध धंदे आणि गुन्हेगारी वाढली असेल तर शहरात लवकरच ‘वॉश आउट’ मोहीम राबवली जाईल. यात कोणत्याही अवैध धंदेवाल्यांची गय केली जाणार नाही.” – सुनील नंदवाळकर, उपविभागीय पोलिस अधिकारी, अमळनेर