पत्नीच्या हत्याप्रकरणात पतीला मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा
जळगाव लाईव्ह न्यूज । २१ जुलै २०२४ । चाळीसगाव तालुक्यातील नवे वाघडू गावातील भिकन भाऊराव पवार या प्रौढाला पत्नीच्या हत्याप्रकरणात जळगाव जिल्हा न्यायालयाचे न्यायाधीश जे जे मोहिते यांनी मरेपर्यंत जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
वाघडू येथे राहणारे भिकन पवार याने १८ मे २०१९ च्या पहाटे ५ वाजता त्याची पत्नी अन्नपूर्णा ही दुसऱ्या सोबत निघून जाईल या संशयावरून तिच्या डोक्यात कुऱ्हाडीचे वार करून जीवे ठार मारले होते. याबाबत गावाचे पोलिस पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल झाला होता. तपासी अधिकारी पोलिस उपनिरीक्षक युवराज रबडे यांनी सखोल तपास करून आरोपी विरुद्ध पुरावे गोळा केले.
जिल्हा व सत्र न्यायाधीश-५ जे.जे. मोहिते यांच्या कोर्टात हा खटला चालला. सरकारतर्फे १३ साक्षीदारांच्या साक्ष नोंदवण्यात आली. यात पोलिस पाटील, रावसाहेब पाटील, मच्छिंद्र खैरनार व तपासी अधिकारी यांच्या साक्षी महत्त्वाच्या ठरल्या. भिकन याच्यावर घटनेच्या तीन महिन्यांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल असल्याचे कोर्टाच्या निदर्शनास आणून देण्यात आले. सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरून कोर्टाने भिकन पवार याला दोषी ठरवून आजन्म कारावासाची शिक्षा व दहा हजार रुपये दंड ठोठावला. सरकारतर्फे सरकारी वकील नीलेश चौधरी यांनी काम पाहिले. त्यांना केस वॉच दिलीप सत्रे व पैरवी अधिकारी पोलिस नाईक चेतन ठाकरे यांचे सहकार्य लाभले.