जळगाव लाईव्ह न्यूज। २२ जुलै २०२३। अनेकदा घरात वाद झाल्याने, गैरसमज झाल्याने लहान मुलांच्या मनावर वाईट परिणाम होतो. त्यामुळे ते काहीही न सांगता घरातून निघून जातात. बऱ्याच वेळा मुले हरवून जातात. परंतु, नंतर ती मुले जातात कुठे? हा मोठा प्रश्न होता. त्यासाठी ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ राबविले जात आहे. या निराधार, बेघर झालेल्या अल्पवयीन मुलांना घर मिळावे, असे या ऑपरेशनचे उद्दिष्ट आहे.
ऑपरेशन नन्हे फरिश्ते या मोहिमेअंतर्गत मध्य रेल्वेच्या सुरक्षारक्षक दलाच्या जवानांनी गेल्या ३ महिन्यात ४०८ बालकांची घरवापसी केली आहे. मध्य रेल्वेच्या रेल्वे सुरक्षा दल, रेल्वे पोलिस आणि इतर फ्रंटलाइन रेल्वे कर्मचारी यांच्या समन्वयाने ‘ऑपरेशन नन्हे फरिश्ते’ अंतर्गत एप्रिल ते जून या गेल्या ३ महिन्यांत मध्य रेल्वेवरील रेल्वे स्टेशन, प्लॅटफॉर्मवरील ४०८ मुलांची सुटका केली आहे. यामध्ये ३१८ मुले आणि ९० मुलींचा समावेश आहे.
एकट्या भुसावळ विभागातून ११९ मुलांची सुटका करण्यात आली आहे. यात ९४ मुले व २५ मुलींचा समावेश आहे. चाइल्डलाइन सारख्या स्वयंसेवी संस्थेच्या मदतीने त्यांचे पालकांशी पुनर्मिलन झाले आहे. भांडणामुळे किंवा काही कौटुंबिक समस्यांमुळे किंवा चांगले जीवन किंवा शहराचे ग्लॅमर आदींच्या शोधात आपल्या कुटुंबीयांना न सांगता रेल्वे स्थानकावर येणारी मुले प्रशिक्षित सुरक्षा रक्षक दलाच्या जवानांना आढळतात.