एरंडोलजळगाव जिल्हा

निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानाची कास धरा- डॉ. श्रीधर देसले

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । १७ सप्टेंबर २०२१ । कांदा पीक कमी कालावधीत समाधानकारक उत्पादन देणारे पीक असून त्यासाठी शेतकऱ्यांनी नवतंत्रज्ञानाची कास धरून कांद्याचे उत्पादन घ्यावे, असे आवाहन राहूरी महात्मा फुले कृषि विद्यापिठातील उद्यानविद्यामधील सहयोगी प्राध्यापक डॉ. श्रीधर देसले यांनी केले.

एरंडोल तालुक्यातील खर्ची बु. येथे तालुकास्तरीय कौशल्य विकास व आत्मा योजनेअंतर्गत निर्यातक्षम कांदा लागवड प्रशिक्षण वर्ग आयोजीत करण्यात आला होता. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी व्यासपीठावर तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे, ज्येष्ठ नागरिक उत्तम माळी, प्रगतिशिल शेतकरी अजित पाटील उपस्थितीत होते. या प्रशिक्षण वर्गामध्ये आत्मा गटाचे सदस्य तसेच खर्ची, रवंजे, खडके आदी गावांमधील 105 कांदा उत्पादक शेतकरी उपस्थीत होते. खर्ची परिसरातील प्रमुख पीक कांदा मानले जाते. परिसरात मोठ्या प्रमाणात कांदा लागवड केला जातो. ज्यातुन फायदा तर होतो पण काही किरकोळ चुकांमुळे नुकसानही होत असते. अनावश्यक औषधांची फवारणी त्यामुळे वाढलेला खर्च, कीड नियंत्रणासाठी विशेष प्रयत्न करता यावे, यासह निर्यातक्षम कांदा उत्पादनासाठी तंत्रज्ञानासह योग्य मार्गदर्शन मिळावे या उद्देशाने एरंडोल कृषी विभागच्या माध्यमातुन खर्ची बु येथे कांदा लागवड तंत्रज्ञान प्रशिक्षण आयोजित केले होते. प्रशिक्षण वर्गासाठी राहुरी कृषी विद्यापिठाचे डॉ. श्रीधर देसले प्रमुख मार्गदर्शक होते.

डॉ. श्रीधर देसले यांनी बिज प्रक्रीया पासून ते रोप लागवड करण्याची शास्त्रशुद्ध पद्धतीचे प्रात्यक्षिक करून दाखविले. बाजारातील सद्यस्थिती, भविष्यातील कांद्याचे दर आणि कांदा साठवून ठेवण्याचा कालावधी याचा ताळमेळ कसा साधावा यावर त्यांनी विशेष भर दिला. जैवीक खतांचा वापर करून कमी खर्चात पोषक आणी निरोगी पिक कसे घेता येईल यावर भर देण्याचे मार्गदर्शन डॉ. श्रीधर देसले यांनी केले.

कांदा उत्पादन वाढीसाठी परागीभवन ही प्रक्रीया महत्त्वाची असून त्यासाठी मधुमक्षिका पालन केले पाहिजे असेही ते म्हणाले. तालुका कृषि अधिकारी शरद बोरसे यांनी ईपिक पाहणीद्वारे शेतातील पिक पेरणीबाबत मार्गदर्शन केले. प्रशिक्षण वर्गाच्या शेवटी प्रश्नोत्तरे झालीत यात शेतकऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नाचे समाधानकारक उत्तरे दिली गेली.

प्रशिक्षण वर्गास सहभागी शेतकऱ्यांचे महाराष्ट्र शासनाचे सहभाग प्रमाणपत्र देऊन सन्मानीत करण्यात आले. आत्माचे भूषण वाघ यांनी सूत्रसंचालन केले. एरंडोल कासोदा मंडळ कृषि अधिकारी साळुंखे यांनी आभार मानले. यशस्वीतेसाठी गांधी रिसर्च फाऊंडेशनचे प्रशांत सुर्यवंशी, चंद्रकांत जगताप, अतुल पाटिल, कृषी क्षेत्रीय अधिकारी यांनी सहकार्य केले.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Related Articles

Back to top button