⁠ 
बुधवार, एप्रिल 17, 2024

शिवसेनेच्या मशालीचा आणि उत्तर महाराष्ट्राचा असा आहे इतिहास

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ ऑक्टोबर २०२२ । केंद्रीय निवडणूक आयोगाने उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेच्या गटाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे हे नाव दिलं आहे. तर मशाल हे चिन्ह दिल आहे. मात्र उत्तर महाराष्ट्राला शिवसेनेच मशाल हे चिन्ह काही नवीन नाही. शिवसेनेचे तत्कालीन नेते छगन भुजबळ हे २ मार्च १९८५ ला शिवसेनेच्या मशाल या चिन्हावर विधानसभा आमदार म्हणून निवडून आले होते. ते मुंबईतील माजगाव या मतदारसंघातून लढले होते. मात्र मुळचे नाशिकचे असणारे छगन भुजबळ हे उत्तर महाराष्ट्रातले शिवसेनेच्या मशालीवर निवडून आलेले आमदार ठरले.

विशेष बाब म्हणजे, छगन भुजबळ हे त्याकाळचे शिवसेनेचे पहिले आणि एकमेव आमदार होते. त्यानंतर मुंबई महानगरपालिकेची निवडणूक देखील शिवसेनेने मशाल या चिन्हावर लढवली होती. यावेळेस तब्बल ७४ नगरसेवक निवडून आले होते. छगन भुजबळ हे शिवसेनेचे त्या वेळेचे महापौर झाले होते.

छगन भुजबळ यांची कार्यकिर्द संपूर्ण उत्तर महाराष्ट्राला चांगलीच ज्ञात आहे. 1982 ते 83 मध्ये छगन भुजबळ पहिल्यांदा नगरसेवक झाले होते. त्यानंतर ते मुंबई महानगरपालिकेचे विरोधी पक्षनेते झाले. १९९१ला त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर १९९१ मध्ये ते महसूल मंत्री व गृहनिर्माण मंत्री झाले. 1995 पर्यंत त्यांनी मंत्रिपद भूषवले. त्यानंतर 1996 मध्ये ते विधान परिषदेचे विरोधी पक्ष नेते झाले.

पुढे 1999 साली ते महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री झाले. पुढे 2004 मध्ये ते येवला मतदारसंघातून लढू लागले. 2004 ते 2008 ते पुन्हा मंत्री झाले. आठ डिसेंबर 2008 रोजी महाराष्ट्राचे ते दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री झाले. येवला मतदार संघातून ते आता विधानसभेत आमदार आहेत 2019 साली ते महाविकास आघाडी सरकारमध्ये अन्न व नागरी पुरवठा मंत्री होते.

यामुळे जरी शिवसेनेला मशाल हे चिन्ह मिळालं असलं तरी या मशालीचे शिवसेनेचे पहिले आमदार हे छगन भुजबळ होते. त्यांचा संबंध हा थेट उत्तर महाराष्ट्राशी येतो यामुळे आता उत्तर महाराष्ट्राला शिवसेनेच्या मशालीची वेगळी ओळख करून देण्याची गरज नाही.