⁠ 
शुक्रवार, मे 3, 2024

महामार्गावर वाहनधारकांना लुटणारे गजाआड, धारदार शस्त्रे केली जप्त

जळगाव लाईव्ह न्यूज । ११ जून २०११ । शहरालगत राष्ट्रीय महामार्गावर चार चाकी वाहनांना रोखून त्यांना लुटणाऱ्या गॅंगमधील तिघांना जळगाव तालुका पोलिसांनी अटक केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल झाल्यानंतर लागलीच गुन्ह्याचा छडा लावला असून अटकेतील तिघांकडून गावठी कट्टा, चॉपर व चाकू जप्त करण्यात आले आहेत.

मुक्ताईनगर येथील रहिवासी असलेले आतिक बिलाल खान हे गुरुवारी रात्री स्वतःची चारचाकी क्रमांक एमएच.१८.डब्ल्यू.६८८५ ने धुळे ते मुक्ताईनगर असा प्रवास करीत होते. प्रवासादरम्यान दुपारी साडेतीन वाजता महामार्गावरील खोटे नगर नजीक हॉटेल राधिकासमोर त्यांच्या वाहनाला चौघांनी अडवले. दोन मोटार सायकलवर चौघे जण त्यावेळी त्यांच्या चारचाकी वाहनाला आडवे आले होते. तरुणांनी आतिक खान यांना मारहाण करीत त्यांच्याकडून रोख ६०० रुपये व ४०० रुपयांचा पेन हिसकावला.

आतिक बिलाल खान यांनी मुक्ताईनगर येथे गेल्यावर मुक्ताईनगर पोलिस स्टेशनला या जबरी चोरीची फिर्याद दाखल केली. सदर गुन्ह्याचे घटनास्थळ जळगाव तालुका पोलिस स्टेशन हद्दीतील होते. त्यामुळे हा गुन्हा जळगाव तालुका पोलिसात वर्ग करण्यात आला.

या पथकाने लावला छडा
गुन्हा दाखल झाल्यानंतर पो.नि. रविकांत सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उप निरीक्षक कल्याण कासार, पो.हे.कॉ. सतिष हाळणोर, पो.हे.कॉ. वासुदेव मराठे, पो.ना. विजय दुसाने, ललित पाटील, प्रविण हिवराळे, सुशिल पाटील, अनिल मोरे, पो.कॉ. दिपक कोळी, दिपक राव यांच्य्या पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवण्यास सुरुवात केली. पो.नि. रविकांत सोनवणे यांना मिळालेल्या गुप्त माहितीनुसार या घटनेतील जबरी लुट करणारे रोहन उर्फ रॉनी मधुकर सपकाळे (दांडेकर नगर, पिंप्राळा) हा एका सिल्व्हर रंगाच्या सॅन्ट्रो कार एमएच 19 क्यु 990 मधून खोटेनगर नजीक महामार्गावर फिरत असल्याचे समजले. त्यांनी तात्काळ आपल्या सहका-यांच्या मदतीने त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातील कारची तपासणी केली असता त्यात गावठी बनावटीचे पिस्तुल, एक धारदार चॉपर व एक लोखंडी धारदार चाकू तसेच जबरी चोरीतील सहाशे रुपये असा ऐवज मिळून आला. त्याची सखोल चौकशी केली असता त्याने त्याच्या साथीदारांची नावे कबुल केली. अनिकेत मधुकर सपकाळे (दांडेकर नगर, जळगाव) व सतिष रविंद्र चव्हाण (ओमशांती नगर) अशी नावे त्याने उघड केली. उर्वरीत दोघांना देखील ताब्यात घेत अटक करण्यात आली.

तालुका पोलिसांनी अवघ्या काही तासात गुन्हा उघडकीस आणला असून संशयितांकडून आणखी गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे.