जळगाव लाईव्ह न्यूज । २० मे २०२२ । गेल्या एक ते दीड महिन्यात कोळसा टंचाईमुळे राज्यावर वीजसंकट ओढवले होते. मात्र गेल्या काही दिवसापासून राज्यातील वीजपुरवठा सुरळीत सुरु असल्याने नागरिकांना दिलासा मिळत आहे. दरम्यान कोळसा टंचाईदरम्यान, दीपनगर औष्णिक केंद्रातुन क्षमता असूनही एक हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती झाली नव्हती. मात्र सध्या तीन दिवसांचा कोळसा उपलब्ध असून, राज्याची विजेची गरज भागवण्यासाठी गुरुवारी मेमध्ये प्रथमच उच्चांकी वीजनिर्मिती झाल्याचे सूत्रांनी सांगितले.
दीपनगर औष्णिक वीजनिर्मिती केंद्रात कोळसासाठा कमी आहे. सध्याही तो कमी असला तरी गत महिन्याच्या तुलनेत वाढ झाली आहे. दीपनगरातील तिन्ही वीजनिर्मिती संचांची क्षमता १२१० मेगावॅट असली तरी केंद्रातून ९५० मेगावॅटपर्यंत विजेची निर्मिती केली जात होती. गुरुवारी मात्र राज्याची वाढती मागणीमुळे कळवा येथील लोड डिस्पॅच सेंटरच्या सूचनेनुसार १ हजार मेगावॅटपेक्षा अधिक वीजनिर्मिती करण्यात आली.
यंदाच्या मे महिन्यातील सर्वाधिक १ हजार २ मेगावॅट विजेची निर्मिती करण्यात आली. यापूर्वी केवळ ९५० मेगावॅटपर्यंत वीजनिर्मिती झाली होती. दीपनगरातील ५०० बाय दोनच्या संचांतून ४५० मेगावॅटपर्यंत तर २१० मेगावॅट क्षमतेच्या संच तीनमधून १०० मेगावॅटपेक्षा अधिक विजेची निर्मिती करण्यात आली आहे. यामुळे राज्यातील विजेची काहीअंशी तूट भरून काढण्यास मदत होणार आहे.
कोळशाची गुणवत्ता वाढली
दीपनगरात कोळसाटंचाई कायम असली तरी गेल्या महिन्याच्या तुलनेत सध्या चांगल्या गुणवत्तेचा कोळसा मिळत आहे. यामुळे संच तीनमधून प्रदूषणाचे प्रमाण कमी होऊन या संचातून विजेच्या निर्मितीचा टक्काही वाढला आहे. प्रकल्पातून ८० टक्क्यांपेक्षा अधिक पीएलएफ गाठून विजेची निर्मिती होत असल्याने विजेचे मूल्यही नियंत्रणात राहणार आहे.