आरोग्यसंकटावर मोठा दिलासा ! मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून जळगावातील ७९५ रुग्णांना मदत

ऑगस्ट 4, 2025 5:10 PM

जळगाव लाईव्ह न्यूज । मुख्यमंत्री सहाय्यता निधीमधून नाशिक विभागात १ जानेवारी ते ३१ जुलै २०२५ या कालावधीत ३,५४२ रुग्णांना एकूण ३२ कोटी ३२ लाख ५ हजार रुपयांची मदत मंजूर करण्यात आली आहे. यामध्ये जळगाव जिल्ह्यातील ७९५ रुग्णांना ६ कोटी ९९ लाख ४५ हजार रुपयांची मदत देण्यात आली असून, ही मदत रुग्णांच्या उपचारासाठी जीवनदायिनी ठरत आहे.

cm fund

राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षात पेपरलेस व डिजिटल प्रणालीची अंमलबजावणी करण्यात आली आहे. या प्रणालीमुळे आता रुग्णांना आणि त्यांच्या नातेवाईकांना मंत्रालयात प्रत्यक्ष येण्याची गरज उरलेली नाही. जिल्हास्तरावरच सहाय्यता कक्ष सुरू करण्यात आल्यामुळे अर्जप्रक्रिया सुलभ झाली असून, रुग्णांना कमी वेळेत, अचूक आणि पारदर्शक पद्धतीने मदतीचा लाभ मिळू लागला आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी अंतर्गत कॉक्लियर इम्प्लांट (वय २–६ वर्षे), हृदय, किडनी, यकृत, फुफ्फुस, बोन मॅरो प्रत्यारोपण, कर्करोग, अपघात, मेंदूचे आजार, नवजात शिशूंच्या आजारांवरील उपचार, भाजलेले व विद्युत अपघातग्रस्त रुग्ण यांसारख्या २० गंभीर आजारांवर उपचारासाठी आर्थिक सहाय्य दिले जाते. या योजनेचा उद्देश म्हणजे गरजू रुग्णांना आवश्यक त्या उपचारांची मदत वेळेत आणि त्यांच्या आवाक्यात मिळणे.

मदतीसाठी अर्ज करताना आवश्यक कागदपत्रांमध्ये आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला (वार्षिक उत्पन्न १.६० लाखांपेक्षा कमी असणे आवश्यक), वैद्यकीय अहवाल, खर्चाचे प्रमाणपत्र, जिओ-टॅग फोटो (रुग्ण दाखल असल्यास अनिवार्य), संबंधित रुग्णालयाची संगणक प्रणालीवरील नोंद, अपघातप्रकरणी पोलीस डायरीची नोंद आणि अवयव प्रत्यारोपणाच्या प्रसंगी ZTCC नोंदणी पावती यांचा समावेश होतो. सर्व कागदपत्रे PDF स्वरूपात तयार करून [email protected] या ईमेल पत्त्यावर पाठवावीत. अधिक माहितीसाठी टोल-फ्री क्रमांक 1800 123 2211 वर संपर्क साधता येईल.

या योजनेच्या माध्यमातून जळगाव जिल्ह्यातील शेकडो कुटुंबांना आरोग्यसेवेसाठी दिलासा मिळाला असून, अनेक रुग्णांना वेळेवर उपचार घेता आले आहेत. ही योजना गरजूंना नवजीवन देणारी ठरत आहे.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्षाचे प्रमुख रामेश्वर नाईक यांनी सांगितले की, “पेपरलेस प्रणाली, डिजिटल तंत्रज्ञान आणि जिल्हास्तरीय कक्षांमुळे गरजू रुग्णांना सहज मदत पोहोचवणे शक्य झाले आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीमुळे रुग्ण व नातेवाईकांच्या समस्या सोडविणे आता अधिक सुलभ झाले आहे. अर्ज करणे आणि आर्थिक मदत मिळवणे पूर्वीपेक्षा खूप सोपे बनले आहे.”

या योजनेमुळे समाजातील शेवटच्या घटकापर्यंत आरोग्य सुविधा पोहोचवण्याचे ध्येय प्रत्यक्षात साकार होत असल्याचे दिसून येते.

चेतन पाटील

पत्रकारिता क्षेत्रात गत ९ वर्षांपासून कार्यरत. देश-विदेशातील विशेष बातम्यांचा अनुभव. नोकरी, शैक्षणिक, विविध योजना संदर्भातील बातम्यांचे विशेष लेखन. जळगाव, पुणे येथील दैनिकात संपादकीय विभागात संपादनाचा अनुभव.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now