जळगाव लाईव्ह न्युज | ८ सप्टेंबर २०२१ | सोमवारी तसेच काल मंगळवारी दिवसभर अजिंठा पर्वतरांगामध्ये तसेच जामनेर तालुक्यात मुसळधार पाऊस झाला. चक्रीवादळ आणि अतिवृष्टीमुळे तालुक्यातील सुमारे ३५ हजार हेक्टरवरील पिके उद्ध्वस्त झाली आहेत.
या चक्रीवादळमुळे २५० घरांची पडझड झाली आहे. तर तालुक्यातील पशुधनाचेही नुकसान झाले आहे. तसेच कापणीवर आलेल्या केळीच्या बागा आणि पूर्वहंगामी कापसाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. दरम्यान, आज बुधवारी सकाळपासून भाजप नेते माजीमंत्री गिरीश महाजन यांनी तालुक्यातील नुकसानग्रस्त भागांना भेट देऊन पाहणी केली.
अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. शेतांमध्ये पिके पाण्याखाली गेली आहेत. वादळामुळे तालुक्यातील अनेक गावांमध्ये घरांवरची पत्रे उडून गेली तर काही घरांची पडझड झाली आहे. रस्त्यांवरील पूल पाण्याखाली गेल्याने गावांचा संपर्क तुटला आहे.
जामनेर तालुक्यातील २० ते २५ गावांमध्ये अतिवृष्टीमुळे हानी झाल्याचे स्थानिक प्रशासनाकडून करण्यात आलेल्या पंचनाम्यांमध्ये समोर आले आहे. काही ठिकाणी अजूनही पंचनामे करण्याचे काम सुरू आहे. तालुक्यातील हिंगणे, ओझर खुर्द आणि ओझर बुद्रुक, रामपूर, लहासर, ढालशिंगी, जुनोने, तळेगाव आणि पहूर, टाकळी बुद्रुक, मेणगाव, हिरवखेडा दिगर, देवळसगाव, वडगाव तिघ्रे, वाघारी, तिघ्रे वडगाव, भागदरा, तोंडापूर, शेळगाव, कासली व सावरला या गावांमध्ये पुराचे पाणी घुसल्याने मोठे नुकसान झाले आहे. या सर्वच ठिकाणी शेती पिकांचे नुकसान मोठ्या प्रमाणावर झाले आहे.