⁠ 
शुक्रवार, एप्रिल 26, 2024

हृदयद्रावक : बाळाचा चेहरा पाहण्यापूर्वीच मातेने घेतला जगाचा निरोप, नातेवाईकांचे डॉक्टरांवर आरोप

जळगाव लाईव्ह न्यूज । २२ जानेवारी २०२२ । शहरातील अँपेक्स रुग्णालयात प्रसृतीनंतरच्या शस्त्रक्रियेदरम्यान अतिरक्तस्त्राव झाल्याने एका बाळंतीण महिलेचा आज पहाटे दोन वाजण्याच्या सुमारास मृत्यू झाला. मुलगा जन्माला आला आणि बाळाचा चेहरा पाहण्याआधीच तिला काळाने हिरावून घेतल्याने कुटुंबावर मोठे दुःख कोसळले आहे. डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळं मृत्यू झाल्याचा आरोप महिलेच्या पतीसह कुटुंबीयांनी केला आहे. तर, डॉक्टरांनी हे आरोप फेटाळून लावले आहेत. शनिवारी सकाळी बराच वेळ रुग्णालयात गोंधळ सुरु होता.

जळगावातील गणेश कॉलनी परिसरातील श्रीकृष्ण कॉलनीत जयप्रकाश विश्‍वकर्मा हे परिवारासह वास्तव्यास आहेत. त्यांचे बजरंग बोगद्याजवळ जयेश ऑटो पार्ट्स नावाने गॅरेज आहे. जयप्रकाश यांची पत्नी पूजा (वय-३०) यांना शुक्रवारी सकाळी प्रसूतीसाठी जळगावातील डॉ.तिलोत्तमा गाजरे यांच्याकडे दाखल करण्यात आले होते. याठिकाणी नार्मल प्रसूती होऊन त्यांनी एका गोंडस मुलाला जन्म दिला. त्यानंतर सायंकाळी पूजा हिची प्रकृती खालावली. त्यामुळे तिला अपेक्स रुग्णालयात दाखल करावे लागेल, असे डॉक्टरांकडून विश्वकर्मा कुटुंबीयांकडून सांगण्यात आले.

पूजाला अपेक्स हॉस्पिटलच्या अतिदक्षता विभागात दाखल करण्यात आल्यानंतर तिचा रक्तस्त्राव थांबत नसल्याने डॉ. तिलोत्तमा गाजरे यांच्यासह इतर डॉक्टरांनी शस्त्रक्रिया केली. रात्री साडेअकरा वाजेच्या सुमारास शस्त्रक्रिया पार पडली. पूजा हिची प्रकृती ५० टक्के चांगली असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, ४८ तासापर्यंत तिला अतिदक्षता विभागात निरिक्षणाखाली ठेवण्याचे डॉक्टरांनी सांगितले. यानंतर दोन वाजेच्या सुमारास पूजाची प्रकृती पुन्हा खालावल्याचे डॉक्टरांनी सांगितले. पती जयप्रकाश हे पाहण्यासाठी गेले असता, पूजा हिचा मृत्यू झाल्याचे समोर आले आल्याचे विश्वकर्मा कुटुंबियांनी सांगितले.

नॉर्मल प्रसूती झाली. जन्माला आलेल्या मुलाची प्रकृती उत्तम होती. नार्मल प्रसूती असताना अचानक प्रकृती कशी खालावली. पूजाचा आधीच मृत्यू झालेला होता असा आरोप जयप्रकाश विश्वकर्मा यांनी केला आहे. मात्र, डॉक्टरांनी उशिरा कळविले. मृत्यूनंतर लगेचच बिल व इतर कागदोपत्री प्रक्रिया करण्यास सांगण्यात आले. याबाबत पोलिसांत तक्रार दिली आहे. डॉक्टरांच्या निष्काळजीपणामुळे पूजाचा मृत्यू झाला असून कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे. तसेच इन कॅमेरा शवविच्छेदन केल्यानंतरच मृतदेह ताब्यात घेऊ, असं जयप्रकाश व त्यांच्या कुटुंबीयांनी स्पष्ट केलं आहे. सकाळपासूनच रुग्णालयात नातेवाईकांनी गर्दी करीत कारवाईची मागणी केली होती.

प्रसूतीनंतर गर्भपिशवी आकुंचन पावणे गरजचे असते. मात्र पूजा हिची गर्भपिशवी पाहिजे, त्या प्रमाणात आकुंचन न पावल्याने रक्तस्त्राव झाला. अतिरक्तस्त्रावामुळे तिचा मृत्यू झाला. तिला वाचविण्यासाठी आवश्यक ते सर्व प्रयत्न केले, मात्र प्रयत्नांना यश आले नाही, असे डॉ.तिलोत्तमा गाजरे यांनी सांगितले.

पहा नातेवाईकांचा आक्रोश :

हे देखील वाचा :