⁠ 
सोमवार, मे 27, 2024

भरधाव वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार दाम्पत्य ठार ; मुक्ताईनगर तालुक्यातील घटना

जळगावातील बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

जळगाव लाईव्ह न्यूज । २४ एप्रिल २०२४ । भरधाव असलेल्या अज्ञात वाहनाने दुचाकीला जोरदार धडक दिली. यात दुचाकीस्वार दाम्पत्य जागीच ठार झाल्याची दुर्दैवी घटना मुक्ताईनगर तालुक्यातील खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीराजवळ घडली. सुभाष रामराव घोडकी (४०) आणि त्यांची पत्नी सोनूबाई सुभाष घोडकी (३४) दोन्ही रा. निमखेडी खुर्द (ता. मुक्ताईनगर) असे मयत दाम्पत्याचे नाव आहे. पघातानंतर अज्ञात वाहनचालक वाहन घेवून घटनास्थळावरून पसार झाला असून याप्रकरणी मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, मुक्ताईनगर तालुक्यातील निमखेडी खुर्द गावात सुभाष घोडकी आणि त्याची पत्नी सोनुबाई घोडकी हे वास्तव्याला आहे. दोघे पतीपत्नी हे मध्यप्रदेशातील फोपनार येथे नातेवाईकांकडे दुचाकीने गेले होते. मंगळवारी २३ एप्रिल रोजी दुपारी ते निमखेडी खुर्द येथे येण्यासाठी दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएफ ९२११) ने निघाले होते. दुपारी साडेतीन वाजेच्या सुमारास खामखेडा पुलाजवळील चमत्कारी हनुमान मंदीरासमोरून जात असतांना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगाने येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली.

या अपघातात सुभाष घोडकी आणि सोनूबाई घोडकी हे दाम्पत्य ठार झाले. तर अपघात घडल्यानंतर अज्ञात वाहनधारक हा वाहन घेवून पसार झाला आहे. याप्रकरणी मयताचा पुतण्या प्रविण मोतीलाल घोडकी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून मुक्ताईनगर पोलीस ठाण्यात अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे निमखेडी खुर्द गावात हळहळ व्यक्ती केली जात आहे.